Wednesday, August 12 2020 8:19 am

भावाने केली भावाची हत्या तिघांना अटक

ठाणे : दुकानातील नोकरांसमोर अपमान करतो, तसेच इच्छेविरूद्ध काम करतो. या रागातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी कोपरीमध्ये उघडकीस आला आहे. महेश चावला (४८) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तिचे नाव आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी महेशचा भाऊ अनिल चावला (४५) आणि दुकानातील नोकर अभय अग्निहोत्री (१९), शोबीत सिंह (१९) यांना अटक केली आहे. हत्येनंतर महेशचा मृत्यू दुकानातील शिडीवरून पडून झाल्याचा बनाव अनिलने रचला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याचे हे बिंग फुटले.
कोपरी येथील गावदेवी मंदीर परिसरात महेश आणि अनिलचे मे. रतन सुपरमार्केट नावाचे एकमजली दुकान आहे. दुकानाच्या पहिल्या मजल्यावर अनिल चावला राहतो. तर, महेश हा कोपरीमधील किशोरनगर परिसरात पत्नाी आणि दोन मुलांसोबत राहतो. मात्र, दुकानाच्या कारभारावरून महेश आणि अनिलमध्ये वारंवार वाद होत असे. यातून नोकरांसमोर अनिलला अपमानित व्हावे लागत होते. त्यामुळे अनिलने २ जुलैला महेशच्या हत्येचा कट रचला. त्याने दुकानातील नोकर अभय आणि शोबीत सिंह यांना बोलावून घेतले. त्यानंतर महेश हा दुकानात असताना अनिलने महेशच्या डोक्यात लोखंडी वस्तूने हल्ला केला. या घटनेत महेशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अनिलने महेश याचा दुकानील शिडीवरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव पोलिसांसमोर रचला. मात्र, कोपरी पोलिसांच्या तपासात त्याचे हे बिंग फुटले. त्यानंतर अनिलने हत्येची कबूली दिली. याप्रकरणी अनिल, अभय आणि शोबीत या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे, अशी माहिती कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी दिली.