Sunday, November 18 2018 9:52 pm

भारतीय महिलांचा दक्षिण आफ्रिकेत दुहेरी मालिकाविजय

वृत्तसंस्था/ केपटाऊन:पाचव्या व शेवटच्या टी-20 लढतीत भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकन महिलांना 54 धावांनी मात दिली व दक्षिण आफ्रिकन दौऱयाची दुहेरी मालिकाविजयाने सांगता केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 बाद 166 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव 18 षटकात अवघ्या 112 धावांमध्येच गुंडाळला गेला. ही टी-20 मालिका भारताने 3-1 फरकाने जिंकली. यापूर्वी या संघाने वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती.भारताच्या डावात मिताली राजच्या 62 धावांची खेळी वैशिष्टय़पूर्ण ठरली. पण, प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकन महिला संघाला विजयाच्या आसपासही फिरकता आले नाही. अनुभवी रुमेली धारने 4 षटकात 26 धावात 3 तर गोव्याच्या शिखा पांडेने 4 षटकात 16 धावात 3 बळी घेत दक्षिण आफ्रिकन डावाला चांगलेच खिंडार पाडले. यापैकी रुमेली धार तब्बल 6 वर्षांनंतर पुनरागमन केल्यानंतर केवळ दुसराच सामना खेळत होती.
शिखा पांडेने सर्वोत्तम गोलंदाजी साकारली. शिवाय, डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड (3 षटकात 3/26) हिने देखील मध्यम-जलद गोलंदाजांच्या प्रयत्नांना पुरक साथ दिली. तब्बल सात महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच एखादी मालिका खेळत असले तरी भारतीय महिलांनी प्रगल्भ खेळ साकारला. टी-20 मालिकेत आजवर भारताचे प्रदर्शन फारसे लक्षवेधी ठरले नसल्याने देखील या मालिकाविजयाचे महत्त्व खास राहिले.
‘प्रारंभी, फलंदाजी अवघड होती. पण, एकदा जम बसल्यानंतर फटकेबाजी करणे सहज शक्य झाले. त्याचा लाभ आम्हाला घेता आला’, असे 4 डावात 3 अर्धशतकांसह 192 धावांचे योगदान देणाऱया मिताली राजने नमूद केले. ती सामनावीर व मालिकावीर पुरस्काराची मानकरी देखील ठरली. कर्णधार हरमनप्रीतने हा दुहेरी मालिकाविजय आता मायदेशात ऑस्ट्रेलिया व इंग्लंड संघाविरुद्ध खेळताना मनोबल उंचावणारा ठरेल, असे नमूद केले. ‘कदाचित आमच्याकडून आणखी 20 धावा होणे गरजेचे होते. पण, मिताली, जेमिमाह, शिखा व पूनम यादव यांनी अतिशय उत्तम गोलंदाजी केली’, असेही ती म्हणाली.
भारतीय डावात मिताली राजने ऑफ सीमर शबनीम इस्माईलच्या षटकात दमदार चौकार वसूल केले तर ऑफब्रेक गोलंदाज रैसिबे व कर्णधार डेन व्हान निएकेर्क यांना लाँगऑनच्या दिशेने षटकारासाठीही पिटाळून लावले.