Monday, June 17 2019 4:30 am

भारतात जागतिक गुंतवणूक वाढण्याचा बॅंकेला विश्‍वास

नवी दिल्ली -: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकारला जागतिक बॅंकेच्या अहवालातून दिलासा मिळाला आहे. 2018- 19 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7.3 टक्के राहील, असा अंदाज जागतिक बॅंकेच्या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतरच्या दोन वर्षात तो 7.5 टक्‍क्‍यांवर झेप घेईल, असे आशादायी चित्र जागतिक बॅंकेच्या अहवालात रेखाटण्यात आले आहे.

जागतिक बॅंकेचा अहवाल प्रकाशित करण्यात आला असून झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताची घोडदौड सुरूच राहील, असे यात म्हटले आहे. चीनचा आर्थिक विकासदर 2019- 20 मध्ये 6.2 टक्‍क्‍यांवर घसरेल आणि 2021 मध्ये त्यांचा विकासदर 6 टक्‍क्‍यांवर घसरेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

2018- 19 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7.3 टक्के राहील आणि त्यानंतरच्या दोन वर्षात तो 7.5 टक्‍क्‍यांवर झेप घेईल, असेही यात म्हटले आहे. भारताची सद्यस्थिती पाहता नोटाबंदी आणि जीएसटी सारख्या धक्‍क्‍यातून सावरून अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने घोडदौड करत असल्याचे स्पष्ट होते असे, जागतिक बॅंकेच्या विकास संभाव्यता विभागाचे संचालक आहान कोसे यांनी सांगितले.

गेल्या चार तिमाहीपासून भारताचा विकासदर जगात सर्वात जास्त आहे. दरम्यानच्या काळात चीनचा विकासदर बराच कमी झाला आहे. त्यामुळे आगामी काळात चीनचा विकासदर वाढण्याची शक्‍यता नाही. पुढील दोन वर्ष तर भारताचा विकासदर जगात सर्वात जास्त राहण्याची शक्‍यता असल्याचे बॅंकेने यासंबंधात जाहीर केलेल्या अभ्यास अहवालात नमूद केले आहे.