Saturday, January 18 2025 5:06 am
latest

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

ठाणे,1 – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्ह्यात दि. 01 एप्रिल ते ते 30 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता मोहिम, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्वाधार योजनेविषयी माहिती देणे, आरोग्य शिबिर, मान्यवरांची भाषणे, संगीत रजनी आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ठाणे जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत श्री. इंगळे यांनी ही माहिती दिली. यावेळी समाज कल्याण निरिक्षक महेश अळकुटे, अभिजीत शिंदे, कार्यालय अधिक्षक वर्षा बिलये आदी उपस्थित होते.

समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन होत असून कोकण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे.
श्री. इंगळे म्हणाले की, अनुसूचित जाती व सर्व प्रकारचे पीडीत शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय म्हणून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, तसेच त्याचा उद्देश साध्य व्हावा, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्यावतीने एप्रिल महिन्यात राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातही आजपासून जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, आरोग्य शिबिरे, योजनांची माहिती देणे, आश्रमशाळा, वसतीगृहे या ठिकाणी व्याख्यान, चर्चासत्रे, ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे व मेळावे, आश्रमशाळा, वसतीगृहांमध्ये स्वच्छता मोहिम, प्रबोधनपर कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन विषयक जनजागृती, पथनाट्य, लाभार्थ्यांचा मेळावा, रक्तदान शिबिरे, संविधान जनजागृती शिबिरे, तृतीयपंथीयांना ओळखपत्र वाटप व प्रमाणपत्र वाटप, गीत गायन स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमास जिल्ह्यातील जनता, वसतीगृहांतील विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. इंगळे यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना केले.