Sunday, April 18 2021 11:28 pm

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती घरातूनच अभिवादन करत साधेपणाने साजरी करण्याचे महापौर आणि महापालिका आयुक्तांचे आवाहन

ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता यंदाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती शासनाच्या नियमावलींचे पालन करून घरातूनच अभिवादन करत साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव भारतीयांसाठी मोठा उत्साहाचा आणि आनंदाचा क्षण आहे. संपूर्ण देशभर विविध स्तरातून महामानवास अभिवादनवर मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन, मिरवणुका मोठ्या उत्साहात काढल्या जातात. ठाणे महापालिकेच्यावतीने देखील दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते, परंतु यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार नाही.

सध्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग वाढत असून दिवसागणिक रुग्णवाढ होत आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा झपाट्याने कार्यरत असून आरोग्य यंत्रणेसोबाबत लसीकरण मोहीम देखील व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. यंदाची जयंती गर्दी न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करत अत्यंत साधेपणाने घरातूनच अभिवादन करत साजरी करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.