Tuesday, July 7 2020 1:20 am

भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना पुन्हा लगेच काँग्रेसमध्ये प्रवेश दिले जाणार नाही. – बाळासाहेब थोरात

नाशिक : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना पुन्हा लगेच काँग्रेसमध्ये समाविष्ट केले जाणार नाही. पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारून गयारामांना प्रवेश द्यायचा की नाही, हे निश्चित केले जाईल. वाऱ्याप्रमाणे दिशा बदलणारे संधीसाधू असतात. पक्ष सोडून गेलेल्यांना पश्चाताप होत असून त्यांना असेच काही दिवस तिकडे राहू द्या, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षात परतण्यास इच्छुक असणाऱ्यांना लगावला.

माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी थोरात हे शुक्रवारी येथे आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी निकालानंतर भाजपमधील खदखद बाहेर येत असल्याचे नमूद केले. सत्तेपासून वंचित रहावे लागल्याने पक्षातील अस्वस्थता उफाळून आली आहे. एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी पक्ष वाढविला. मात्र आज तेच अस्वस्थ असल्याचे थोरात यांनी सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांवर त्यांनी नांव न घेता शरसंधान साधले. भाजपमध्ये गेलेल्या अनेकांना पश्चाताप होत आहे. मात्र, त्यांना काँग्रेसमध्ये लगेच प्रवेश दिला जाणार नाही. पदाधिकारी, नेते सोडून गेल्यानंतर प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काम केले. त्यामुळे कोणालाही पुन्हा पक्षात घेतांना संबंधितांच्या भावना जाणूनच निर्णय घेतला जाईल. खातेवाटपाबाबत महाराष्ट्र विकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. दोन ते तीन दिवसात खातेवाटप होईल. कांद्याचे दर गगनाला भिडल्याने सामान्य नागरिकांचे आर्थिक समीकरण विस्कळीत झाले आहे.

या प्रश्नावर शेतकरी आणि ग्राहक या दोघांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भावना आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरच मदत मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.