Tuesday, December 10 2024 8:24 am

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार

ऊन

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर, जखमींवर मोफत उपचारांचे निर्देश

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानपरिषद सभागृहात माहिती

मुंबई, 21 :- रायगड जिल्ह्यातल्या इरसालवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मदत व बचाव कार्य वेगाने सुरु आहे. दोन हॅलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहेत मात्र खराब हवामानामुळे हवाई मदत कार्यावर मर्यादा येत आहेत. सरकार प्रत्येक बाबींवर बारकाईने नजर ठेऊन आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तर जखमींवर सरकारच्यावतीने मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या सभागृहात निवेदनाद्वारे दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, रायगड जिल्ह्यातल्या चौक-मानवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रायगड जिल्ह्यातल्या मौजे चौक-मानिवली (ता. खालापूर) या महसूली गावाच्या हद्दीतील इरसालवाडी या आदिवासी बांधवांच्या वस्तीवर दरड कोसळल्याची घटना दि. 19 जुलै 2023 रोजी रात्री घडली. या दुर्घटनेत इरसालवाडी या गावातली घरे मातीच्या ढिगाऱ्या खाली गेली आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळं आणि दुर्घटना घडलेले ठिकाण दुर्गम भागात असल्यानं त्याठिकाणी संपर्क साधताना सुध्दा अनेक अडथळे येत होते.

दुर्घटनास्थळ दुर्गम असल्याने त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी जेसीबी सारख्या मशनरी घटनास्थळी पोहोचविण्यासाठी हॅलिकॉप्टरची आवश्यकता आहे. राज्य सरकारने दोन हॅलिकॉप्टर तयार ठेवली आहेत. मात्र खराब हवामानामुळे हॅलिकॉप्टरला उड्डाण करणे शक्य होत नाही, त्यामुळे हवाई आणि यांत्रिक मदतीला सुध्दा मर्यादा येत आहेत. त्यामुळे मनुष्यबळाकडूनचं मदत व बचाव कार्य करावे लागत आहे. ‘एनडीआरएफ’ पथकाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाच्या मदतीला यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, मौजे चौक आणि मौजे वरोसे येथील ग्रामस्थ, विविध विभागाचे शासकीय कर्मचाऱ्यांसह पाचशेहून अधिक मजूरांचा सहभाग आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याला तसेच नागरिकांचे जीव वाचविण्याला सरकारचे प्राधान्य आहे. इरसालवाडीच्या पायथ्याला वैद्यकीय पथके, अॅम्ब्युलन्ससह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तात्काळ उपलब्ध करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सकाळीच घटनास्थळी रवाना झाले आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक आमदार महेश बांदे उपस्थित आहेत. तर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे, मंत्री आदिती तटकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. सकाळपासूनच मंत्रालयातल्या आपत्कालिन नियंत्रण कक्षातून मी स्वत: सर्व बाबींवर लक्ष ठेऊन आहे. इरसालवाडीमध्ये एकुण 48 कुटुंब आहेत, तेथील लोकसंख्या 228 असली तरी अनेक लोक नोकरीच्या आणि रोजगाराच्या निमित्ताने बाहेर गावी असतात त्यामुळे दुर्घटनेच्यावेळी नक्की किती लोक गावात होते हे समजू शकत नाही. इरसालवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जीएसआय) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते. तसेच या ठिकाणी यापुर्वी दरड कोसळणे, भूस्खलन होणे आशा प्रकारच्या घटना घडलेल्या नव्हत्या. खालापूर तालुक्यात दि.17 जुलै दि.19 जुलै 2023 या तीन दिवसात एकुण 499 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. दुर्घटना घडलेले ठिकाण हे अत्यंत दुर्गम भागात असून, सद्यःस्थितीत घटनास्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.