Monday, March 8 2021 6:01 am

भंडाऱ्यात नवजात शिशु केअर रुग्णालयात भीषण आग, १० बालकांचा मृत्य

भंडारा:  जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनीटमध्ये ( SNCU ) शॉर्ट सर्किटने आग लागल्याने दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बाॅर्न युनिट मधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. या शिशु केअर युनीटमधील सात बालकांना वाचविण्यात आले आहे.

अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये आउटबॉर्न आणि इन बाॅर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटर मध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले. तर आऊट बाॅर्न युनिटमधील १० मुलांचा मृत्यू झाला.

रुग्णालयात जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रमोद खंडाते दाखल. रुग्णालयाला पोलिसांचा वेढा असून आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल नागपूर येथून भंडारा रुग्णालयात पहाटे ५.३५ वाजता दाखल झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे.