Monday, September 28 2020 1:23 pm

बोगस बिल्डरपासून सावधान ; पोलिसांचं आवाहन

नवी मुंबई : कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीचा फटका घर खरेदी-विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाला बसला आहे. या महसुलात तब्बल ५० ते ६० टक्के  घट झाली आहे. याचा परिणाम आपसूकच बांधकाम उद्योगालाही बसला आहे. त्यामुळेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांकडून वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत.

मात्र याच ऑफर्स खाली सामान्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकारही समोर येत असल्याने नवी मुंबई पोलिसांनी घर खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन केलं आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून ट्विटरवरुन हे आवाहन करण्यात आलं आहे.

आकर्षक जाहिराती देऊन फसवणूक करणाऱ्या बोगस बिल्डरांपासून सावध राहा असं आवाहन करणारं पत्रक नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांसाठी पोलिसांनी जारी केलं आहे.

नवी मुंबई परीसरात काही बोगस बिल्डरकडून आकर्षक जाहीराती दाखवून प्रकल्पाची जागा स्वत:च्या नावावर नसताना, प्रकल्पाबाबत प्लॅन मंजूर नसताना स्वस्तात फ्लॅट विकत असल्याने भासवून ग्राहकांकडून फ्लॅटची बुकींग घेऊन प्रत्यक्षात फ्लॅटचे किंवा प्रोजेक्टचे कोणतेही बांधकाम न करताना बिल्डरकडुन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

*ग्राहकांनी खालील प्रमाणे खबरदारी घ्यावी असं म्हणत नऊ महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं आहे.*

* केवळ आकर्षक जाहीरातीला न भूलता बिल्डरच्या विश्वासार्हतेबाबत माहिती घ्यावी.

* प्रकल्पाची जागा बिल्डर किंवा विकासक यांच्या नावावर आहे का, याबाबत ७/१२ उतारे तपासावे.

* प्रस्तावित प्रकल्पाचा प्लान मंजुर आहे का, प्रकल्पाची जागा महानगरपालिका किंवा सिडको किंवा एमएसआरडीसी किंवा नैना यांच्या अखत्यारित येत असेल तर त्याबाबत संबंधित प्राधिकरणाकडे किंवा संस्थेकडे चौकशी करुन खात्री करावी.

* फ्लॅट बुकींगसाठी रक्कम दिल्यानंतर बिल्डरने अ‍ॅग्रीमेंट टू सेल करुन देणे मोफा कायद्याप्रमाणे त्यास बंधनकारक आहे.

* प्रोजेक्ट रेरा प्राधिकरणाकडे नोंदविला आहे का याबाबत खात्री करावी.

* फ्लॅटचे अ‍ॅग्रीमेंट टू सेलमध्ये फ्लॅटचा कार्पेट एरिया नेमका नोंदवण्यात आलेला आहे का याबबात तसेच अ‍ॅमिनीटीज, फ्लॅटचा ताबा केव्हा देणार याबाबत स्पष्ट तारीख नमूद असावी.

* प्रोजेक्टचा प्लॅन, नकाशा, प्रोजेक्टच्या ठिकाणी लावणे बिल्डरला बंधनकारक आहे. सदरचा प्लॅन आराखडा, आवश्यक त्या मंजुऱ्या याबाबतची कागदपत्रे संबंधित बिल्डरकडुन प्राप्त करुन त्याच्या खरेपणाबाबत खात्री करावी.

* प्रोजेक्टबाबतचा सर्च रिपोर्ट काढून प्रकल्पाच्या जागेबाबत टाटयर क्लिअर आहे का, काही लिटीगेशन आहे का याबाबत खात्री करावी.

नवी मुंबई आयुक्तालयामधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सन २०२० या चालू वर्षामध्ये आतापर्यंत बिल्डरविरुद्ध फसवणुकीचे एकूण २४ गुन्हे दाखल झाल्याचे पोलिसांनी या पत्रकात म्हटलं आहे.