Saturday, August 24 2019 11:41 pm

बॉलीवूडकरदेखील आता रणात उतरणार:अभिनेते सनी देओल भाजप मध्ये प्रवेश

नवी दिल्ली : आपल्या ढाई किलो का हाथ ने खलनायकांना मारणाऱ्या सनी देओल यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. लोकसभा निवडणुकीची हवा सर्वच बॉलीवूडकरांना लागताना दिसत आहे. मतदारांना आणि त्यांच्या मतांना आपल्या पक्षाकडे खेचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली दिसून येत आहे. यासाठी बॉलिवूड मधील मोठमोठ्या अभिनेते आणि अभिनेत्री यांना आपल्या पक्षात घेण्याचे सत्र सर्वत्र सुरू आहे.
यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या उत्तर मुंबई मतदार संघातून निवडणूक लढत आहेत. त्यात आता बॉलिवूड अभिनेता सनी देओलची भर पडली आहे.

आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला. सनी देओल भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर पंजाबच्या गुरुदासपूर मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत.

भाजप प्रवेशाबाबत सनी देओल म्हणाले की, “मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे.माझे बाबा ज्या प्रकारे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत होते, त्याचप्रमाणे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे. आपल्या देशातील तरुणांच्या आणि देशाच्या विकासासाठी आपल्याला मोदींसारख्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. भाजपसोबत जोडल्यानंतर मी देशातील तरुणांसाठी आणि देशाच्या जनतेसाठी जे काही शक्य आहे, ते करणार आहे.”
शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, ऊर्मिला मातोंडकर आणि आता सनी देओल यांच्यानंतर अजून कोण कोण सेलिब्रिटी निवडणूकीच्या युद्धात उतरणार याबाबत जनता आणि चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.