Thursday, August 22 2019 5:14 am

बॉलिवूड चित्रपटात व्हिलनच्या भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते महेश आनंद यांचं निधन

मुंबई : बॉलिवूड चित्रपटात व्हिलनच्या भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते महेश आनंद यांचं निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी महेश आनंद मृतावस्थेत आढळले. महेश आनंद 57 वर्षांचे होते.महेश आनंद यांचा मृतदेह शनिवारी सकाळी मुंबईतील घरी आढळला. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून कुजलेल्या अवस्थेतील त्यांचा मृतदेह कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला.
80-90 च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये महेश आनंद यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. कुरुक्षेत्र, कुली नंबर 1, विजेता, शहंशाह यासारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी व्हिलन साकारला होता.
महेश आनंद यांनी धर्मेंद्र, सनी देओल, गोविंदा, अमिताभ बच्चन, संजय दत्त यांच्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत चित्रपटात काम केलं आहे. मात्र सध्या काम नसल्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गोविंदासोबत त्यांनी केलेला ‘रंगीला राजा’ हा सिनेमा गेल्याच महिन्यात प्रदर्शित झाला होता.
मुंबईतील वर्सोवा भागात असलेल्या घरात महेश आनंद एकटेच राहत होते. त्यांची पत्नी वेगळी राहत असल्याची माहिती आहे.