Sunday, August 9 2020 11:40 am

बेस्टच्या संपामुळे मुंबईसह ठाणेकरांचे हि हाल !

मुंबई-: बेस्टच्या संपामुळे मुंबईसह ठाणेकरांचे हि हाल होत आहेत. हजारो प्रवासी ठाण्यातून मुंबईसाठी कामाच्या उद्देशाने प्रवास करत असतात. बेस्टच्या सततच्या दुसऱ्यादिवसाच्या बंद मुळे प्रवसिकांमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. शिवसेनेने बेस्ट कर्मचाऱ्यांना संपासाठी दिलेला नैतिक पाठिंबा काढला असला तरी आजही पश्चिम उपनगरात रस्त्यावर एकही बस प्रवाशांसाठी धावत नाहीय. परिणामी प्रवासी खासगी बसेस, रिक्षा, ओला, उबेर आणि मेट्रोने प्रवास करत असल्याचे चित्र आहे.
पश्चिम उपनगरातील वांद्रे, मजास, मरोळ, गोरेगाव, ओशिवरा, दिंडोशी, मालाड, मागाठाणे, दहिसर, गोराई या विविध आगारांमध्ये बेस्ट वाहक आणि चालकांची उपस्थितीच नव्हती. कामावर जाण्यासाठी आम्ही बसडेपोकडे फिरकलोच नाही, अशी माहिती काही वाहक व चालकांनी दिली.

अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानका बाहेर प्रवाशांसाठी खासगी बसेसतर्फे अंधेरी ते वर्सोवा आणि अंधेरी ते लोखंडवाला या मार्गावर सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रत्येक प्रवाशामागे 20 रुपये भाडे आकारले जात आहे. तर गोरेगाव स्थानक ते आयटी पार्क-न्यू म्हाडासाठी गोरेगाव स्थानकापासूनही खासगी बस सेवा सुरू आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आजही गैरसोय होणार आहे. मंगळवारी (8 जानेवारी) मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनाबरोबर कामगार संघटनांच्या सर्व बैठका निष्फळ ठरल्यामुळे संपचिघळला आहे. या बैठकांमध्ये ठोस असा तोडगा न निघाल्यानं दुसऱ्याही दिवशीही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. दुसरीकडे, शिवसेनेनं मंगळवारी संध्याकाळी आयुक्त अजॉय मेहता यांच्याशी चर्चा केल्यानंतर संपाला दिलेला नैतिक पाठिंबा काढून घेतला यामुळे संपात फूट डली आहे. कामगारांच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याने काही बसगाड्या रस्त्यावर उतरविणार, असा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे. शिवसेना संपातून माघार घेत असल्याचे बेस्ट कामगार सेनेचे नेते सुहास सामंत यांनी जाहीर केले.

काय आहेत मागण्या?

सुधारित वेतन करार

दिवाळीचा बाेनस

कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न साेडविणे

बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण

कोट्यवधींचा महसूल बुडाला

सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संपामुळे मंगळवारी एकही बस रस्त्यावर न आल्यानं बेस्ट उपक्रमाला तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. मुंबईच्या रस्त्यांवर दररोज 2,800 बस धावतात आणि त्यातून बेस्ट उपक्रमाला तीन कोटी रुपयांचा महसूल दररोज मिळत असतो. आगामी आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमानं 690 कोटी रुपयांची तूट दाखवली आहे. तर दोन हजार कोटी रुपयांची संचित तूट आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अनधिकृत असल्याचा निर्णय औद्योगिक न्यायालयानं दिला. तसंच संप करू नये, असे आवाहन बेस्ट उपक्रमाने केले. त्यानंतरही संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करणार असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.