Saturday, July 11 2020 10:15 am

बेलापूरमध्ये उभारणार बहुमजली वाहनतळ

नवी मुंबई : शहरातील रस्त्यांवर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमुळे निर्माण होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिले बहुमजली वाहनतळ बेलापूर येथे उभारण्याच्या कामाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे. या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील अन्य विभागांत अशाप्रकारे बहुमजली वाहनतळ उभारण्यात येतील, असे महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

नियोजनबद्ध शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईत नागरिकांना सध्या प्रचंड वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने मोठ्या प्रमाणात पार्क केली जात आहेत. महापालिका व वाहतूक पोलिसांच्या कारवाईनंतरही अनधिकृत पार्किंग कमी होताना दिसून येत नाही. सुरुवातीला सिडकोने शहरातील विविध भागांत निर्माण केलेल्या सार्वजनिक पार्किंगच्या व्यवस्था सध्या शहरात वाढ होत असलेल्या वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी पडत असल्याचे दिसून येते.

शहरातील अनधिकृत पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने पूर्वी सिडकोने निर्माण केलेल्या पार्किंगच्या जागेवर तसेच आवश्यक असेल तेथे सिडकोकडून भूखंड घेऊन त्याठिकाणी पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बेलापूर सीबीडी सेक्टर-१५, भूखंड क्रमांक ३९वर बहुमजली वाहनतळाचे बांधकाम करण्यासाठी कंत्राटदारासोबत करार करण्यास मान्यता मिळावी म्हणून महापालिका प्रशासनाने १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवला आहे.