Tuesday, November 19 2019 4:10 am
ताजी बातमी

बेजबाबदार रस्ता ठेकेदारांकडे महापालिकेचे दुर्लक्ष

ठाणे :-  लहान मुलाला एकदा  सांगितलेले काम तो व्यवस्थित पूर्ण करेल परंतु दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे  खड्डे  कमी करण्याचे काम प्रशासन कधी पूर्ण करेल असा  प्रश्न आता उपस्थित होत आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही शहरात  रस्त्यावरच्या खड्ड्यांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे. शहरात आतापर्यंत ११२२ खड्डय़ांची नोंद झाली असून त्यामध्ये सर्वाधिक ४३५ खड्डे घोडबंदरमधील रस्त्यांवर आढळले असून २५६ खड्डे वागळे इस्टेट भागातील आहेत. प्रत्यक्षात शहरातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले असून त्याकडे पालिकेचे लक्ष गेले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या खड्डय़ांमधून वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डय़ांजवळ चालकवाहनांचा वेग अचानकपणे कमी करत असून यामुळे पाठीमागून येणारे वाहन धडकून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या खड्डय़ांमुळे महामार्गासह अंतर्गत मार्गावर वाहतूक संथगतीने होत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

दरवर्षी ठाणे महापालिकेला रस्त्यात खड्डे पडल्याचे  सांगावे लागत आहे. ४ महिन्यांपूर्वी बांधलेल्या रस्त्यांवर खड्डे  पडतातच कसे? महापालिका ठेकेदारांना रस्त्याचे काम करण्यास सांगत असली तरी या बेजबाबदार ठेकेदारांकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये ११२२ खड्डे पडले असून या खड्डय़ांचे क्षेत्रफळ २३३८ चौ.मी इतके आहे. नौपाडा, हरिनिवास सर्कल, कोरस रोड, लक्ष्मीपार्क परिसर, नितीन कंपनीजवळील सेवा रस्ते, रामचंद्रनगर, कळवा, मनीषानगर, गोकुळनगर, कॅसलमील, मुंब्रा, दिवा, उथळसर, लोकमान्यनगर, सावरकरनगर या भागातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वागळे इस्टेट भागातील इंदिरानगर येथील रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याचे दिसून येते.

मुंबई-नाशिक महामार्गावरील फ्लॉवर व्हॅलीजवळ मोठे खड्डे पडले असून मंगळवारी पेव्हर ब्लॉक टाकून हे खड्डे बुजविण्याची कामे सुरू होती. याशिवाय, या मार्गालगतच्या सेवा रस्त्यांवरही खड्डे पडले आहेत. घोडबंदर भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्गासह सेवा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. माजिवाडा, कापूरबावडी भागात पेव्हर ब्लॉक उखडले असून त्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.