Monday, September 28 2020 1:47 pm

बुश कंपनी येथील कोवीड रूग्णालयाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते लोकार्पण कोरोना विरूद्धच्या लढाईला मिळणार बळ

ठाणे :  राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घोषित केलेल्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहिम उद्यापासून संपूर्ण राज्यात राबविली जात असताना या मोहिमेला आणि कोरोना विरूद्धच्या लढाईला बळ देणा-या बुश कंपनी येथे ठाणे महानगरपालिकेने उभारलेल्या कोविड रूग्णालयाचा अनौपचारिक लोकार्पण सोहळा आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला.

महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातंर्गत बाळकुम-साकेत येथे पहिल्या विस्तारित १०४३ बेडची क्षमता असलेले कोविड रूग्णालय पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने तब्बल २१ दिवसांत उभा करण्यात आले होते. मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शुभहस्ते या कोविड रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला होता.
त्यानंतर दुस-या विस्तारित टप्प्यातंर्गत वागळे प्रभाग समितीतंर्गत बुश कंपनी येथे जवळपास ४९० बेडसची क्षमता असलेल्या कोविड रूग्णालयाची उभारणी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. पालकमंत्री जातीने या रूग्णलयाच्या कामावर लक्ष ठेवून होते. त्याचबरोबर महापौर नरेश गणपत म्हस्के हेही याचा सातत्याने पाठपुरावा करीत होते.
आज या रूग्णालयाचा अनौपचारिक लोकार्पण सोहळा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी बोलताना पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ठाणे शहरामध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी या रूग्णालयामुळे मोठे बळ प्राप्त झाले आहे.
शहरातील एकही व्यक्ती बेडपासून वंचित राहणार नाही ही आमची भूमिका असून या रूग्णालयामुळे ठाणे शहरातील कोरोनाबाधित रूग्णांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे असेही ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी सांगितले की, पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाविरूद्धच्या लढाईचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिका सक्षम असून या रूग्णालयामुळे नागरिकांना नवीन सुविधा प्राप्त झाली आले.
या रूग्णालयामध्ये एकूण ४४० बेडस् असून यातील ३५० बेडस् हे ॲाक्सीजन बेडस् आहेत तर साधे बेडसची क्षमता ९० इतकी आहे. उद्यापासून हे रूग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे.
यावेळी नगरसेवक एकनाथ भोईर, अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देशमुख, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर आदी उपस्थित होते.