मुंबई 27 शेतकऱ्यांची बोगस बि-बियाणे, खत, कीटकनाशक खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी नवीन कायदा लवकरच आणणार आहोत, असे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सांगली जिल्ह्यात बनावट भेसळयुक्त कृषी औषधांची विक्री होत असल्याबाबत सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्याला उत्तर देताना कृषीमंत्री श्री. मुंडे बोलत होते.
मंत्री श्री. मुंडे म्हणाले, कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी करून कीटकनाशनांचे नमुने काढण्यात आले. कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रचार व प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. तसेच राज्यात भेसळयुक्त बोगस बि बियाणे, खत आणि कीटकनाशके यापासून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषीमंत्री, महसूल मंत्री, ग्राम विकास मंत्री, आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली असून अशाप्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई नवीन कायद्याअंतर्गत करण्यात येईल. त्याचा प्रारूप आराखडा अंतिम टप्प्यात आहे, असेही कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.