Monday, June 17 2019 4:06 am

बीड मध्ये सैराटची पुनःवृत्ती !

बीड -: मराठी चित्रपठसृष्टीत ज्या चित्रपटाने अजरामर कामगिरी करून देशात चालणाऱ्या जातीवादाचे दर्शन घडवून व प्रेम विवाहाच्या बंधनातून एक अनोखी कहाणी आपल्याला सैराट या चित्रपटातून दिसले, ज्याप्रकारे आर्चीचा भाऊ चित्रपट संपताना परश्याचा खून करतो त्याच प्रकारची प्रत्यक्ष घटना बीड येथे समोर आली आहे.

बीडमधल्या गांधीनगर भागात असलेल्या आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या सुमित वाघमारे यानं दोन महिन्यांपूर्वी भाग्यश्री साबळे सोबत प्रेमविवाह केला होता. या लग्नाला भाग्यश्रीचा भाऊ संकेत साबळे याचा विरोध होता.  बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याचा राग मनात धरून बीडमध्ये सख्या मेव्हण्यानेच दिवसाढवळ्या स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामुळे बीड शहर चांगलेच हादरले आहे.

आपल्या बहिणीचे लग्न आपल्या मनाविरुद्ध झाले म्हणून त्याने अनेकदा गोंधळही घातला होता. परीक्षा देऊन सायंकाळी दुचाकीवरून घरी परतत असतानाच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पांढऱ्या रंगाच्या कारमधुन भाग्यश्रीचा भाऊ व त्याचा मित्र आले. दोघांनी कारमधुन उतरत सुमित वर धारधार शस्त्राने सपासप वार केले आणि कारमध्ये बसून सुसाट निघून गेले. भाग्यश्री मात्र मोठमोठ्याने ओरडत मदतीची मागणी करीत होती. एका रिक्षाचालकाने तात्काळ धाव घेत सुमितला रिक्षात घालून जिल्हा रूग्णालयात आणले. मात्र जास्त रक्तस्त्राव झालेला असल्याने त्याचा वाटेतच मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले.  ही माहिती वाऱ्यासारखी नातेवाईक व मित्रांना समजली. त्यांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली. भाग्यश्री, सुमितची आई व मावशीने रूग्णालयात आल्यावर हंबरडा फोडला.  रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पेठ बीड पोलीस ठाण्यात सुरू होती.