Tuesday, December 10 2024 7:11 am

बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ ठाणे येथे ठाणे लोकसभा व महाराष्ट्र शिक्षक सेना यांची संयुक्त सभा संपन्न

ठाणे 25 – कोकण शिक्षक मतदार संघ सार्वजनिक निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे (प) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे लोकसभा व महाराष्ट्र शिक्षक सेना यांच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभा ही महाविकास आघाडी व पुरोगामी शिक्षक संघटना,टी.डी.एफ.,बहुजन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संसद, महाराष्ट्र राज्य क्रीडा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुरस्कृत उमेदवार बाळाराम दत्तात्रेय पाटील यांच्या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेची पूर्व तयारी करण्यासाठी घेण्यात आली होती. या सभेला खासदार राजन विचारे, मा.बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यावेळी या सभेला खासदार राजन विचारे यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले,’ बाळाराम पाटील यांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी अतुलनीय आहे. त्यांनी कोकण शिक्षक मतदार संघात केलेले काम हे कौतुकास्पद असून स्वतःचा आमदार निधी तसेच इतर निधी देखील या मतदार संघाच्या विकासाकरिता वापरले आहेत. तसेच शिक्षकांचे प्रश्न संस्थाचालकांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावून न्याय देण्याचं काम केलं आहे. पुढे ते म्हणाले, शिक्षकांसाठी केलेल्या कामाची जाणीव ठेवून शिक्षकांनी येणाऱ्या ३० तारखेला बाळाराम पाटील यांना मत देऊन त्यांना बहुमतांनी विजयी करण्याचं आव्हान केलं.
त्या दरम्यान, बाळाराम पाटील यांनी सभेला संबोधित करताना ते म्हणाले, आमदारकीच्या काळात शिक्षकांच्या प्रश्नांसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढलो, यापुढे ही तुम्ही संधी दिली तर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व तुमच्या हक्कासाठी, पुढील काळातही लढत राहणार अशी ग्वाही उपस्थित शिक्षकांना दिली.
तसेच उपस्थित मान्यवरांनी महाविकास आघाडीच्या वतीने येणार्‍या ३० तारखेला होणार्‍या निवडणुकीत बाळाराम पाटील यांना प्रथम पसंतीचे मत देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी या सभेला ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, बेलापूर जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, ऐरोली जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, ठाणे जिल्हाप्रमुख केदारजी दिघे, नरेश मणेरा, चिंतामणी कारखानीस, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, महिला जिल्हा संघटक श्रीमती. रेखा खोपकर, नरेंद्र शिंदे, भाऊसाहेब गार्गे, मारुती पडळकर तसेच सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, युवासेना पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडी तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.