Wednesday, August 12 2020 9:16 am

बाळकूममध्ये क्षमतेच्या ३० टक्केच रुग्ण;खारेगावमध्ये नव्या रुग्णालयाचा घाट का ? भाजपा गटनेते संजय वाघुले यांचा सवाल

ठाणे : बाळकूम येथील विशेष कोविड रुग्णालयात सध्या क्षमतेच्या केवळ ३० टक्के एवढेच रुग्ण दाखल असताना, खारेगाव येथे आणखी कोविड रुग्णालय उभारण्याचा घाट का घातला जात आहे, असा सवाल भाजपाचे गटनेते संजय वाघुले यांनी महापालिका प्रशासनाला विचारला आहे. त्याचबरोबर खारेगाव येथील नियोजित रुग्णालयाच्या ऑनलाईन निविदा रद्द कराव्यात, असे आवाहन श्री. वाघुले यांनी केले आहे.
ठाणे महापालिकेने खारेगाव येथे आणखी कोविड विशेष रुग्णालय उभारण्यासाठी ऑनलाईन निविदा मागविली आहे. तर पोखरण रोड नं. २ येथेही रुग्णालय उभारण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे गटनेते संजय वाघुले यांनी बाळकूम येथील विशेष कोविड रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी तेथे १०२४ बेडपैकी केवळ ३३० बेडवर रुग्ण दाखल असल्याचे उघडकीस आले. तब्बल ७०० बेड रिकामे असताना आणखी रुग्णालय उभारण्याचा घाट कोणासाठी घातला जात आहे, असा सवाल वाघुले यांनी केला.
वैद्यकिय नियमानुसार १ हजार बेडच्या रुग्णालयासाठी १५० डॉक्टर, ६०० नर्स आणि ४०० वॉर्डबॉयची आवश्यकता असते. मात्र, बाळकूम येथील रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयात १०२४ वरून १३०० पर्यंत खाटा वाढविता येता येईल. तर आयसीयूमधील बेडची क्षमता दोन महिन्यांत १८० पर्यंतही नेता येईल, अशा स्थितीत नवी रुग्णालये का उभारली जात आहेत, असा सवाल नगरसेवक वाघुले यांनी केला. आधी विशेष रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेने वापर केल्यानंतरच नवी रुग्णालये उभारण्याचा विचार करावा, अशी विनंती नगरसेवक वाघुले यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केला आहे.