ठाणे 8 – बाळकुम येथील ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव लोकार्पणानंतरही दोन वर्षे धूळखात पडून आहे. या ढिसाळ कारभाराबाबत आणि अक्षम्य दुर्लक्षाबाबत आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला. महापालिकेत झालेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले असून तत्काळ हा तलाव सुरू करण्याची कडक शब्दात समज दिली.
बाळकुम परिसरातील राममारुती नगर येथे ठाणे महापालिकेने तब्बल २७ कोटी रुपये खर्चून ऑलिम्पिक दर्जाचा धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव उभारला आहे. या तरण तलावाचे दोन वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण केले होते. तेव्हापासून आजतागायत हा तरण तलाव बंदच असून प्रत्यक्षात तरण तलावाचा वापर झालेला नाही. एकप्रकारे करदात्या नागरीकांची ही घोर फसवणूक सुरु आहे. आता ऐन दिवाळीच्या सुट्टीत बच्चे कंपनीला आणि जलतरणपटुंना तलाव उपलब्ध नसल्याने स्थानिकांनी आ.संजय केळकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार बुधवारी आ.संजय केळकर यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात बैठक घेऊन संबधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत तरण तलाव युद्धपातळीवर खुला करण्याचे निर्देश दिले.
यावेळी महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी अधिकारी आणि परिवहन सदस्य विकास पाटील, भाजयुमो ठाणे शहर अध्यक्ष सूरज दळवी, रवीराज रेड्डी, सचिन मोरे उपस्थित होते.
पालिकेच्या ढिसाळ कारभारावर बोट
धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव दिलेल्या या तरण तलावाकडे ठाणे महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे दुर्लक्ष होत आहे. तलावाची कामे पूर्ण झाली नसल्याचे पालुपद लावत केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. आता पुन्हा कामांच्या निविदांचा खेळ सुरू झाला आहे. त्यामुळे या तलावाला मुहूर्त कधी लागणार असा संतप्त प्रश्न श्री.केळकर यांनी अधिकाऱ्यांना विचारला.