Thursday, November 14 2024 3:03 am

बाळकुम ते भाईंदरपाडा-गायमुख कोस्टल रोड बाधित ४९ भूखंडधारकांना भोगवटा वर्ग -२ विकास हक्क प्रमाणपत्राचा होणार फायदा

ठाणे 6 : भूखंडधारक किंवा शेतकरी यांना सरकारकडून मिळालेल्या जमिनींचे पुन्हा सरकारी कामांसाठी हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर मौजे कावेसर येथील पहिल्या दोन भूखंडधारकांना शुक्रवारी महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या हस्ते विकास हक्क प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. बाळकुम ते भाईंदरपाडा-गायमुख कोस्टल रोडसाठी सुरू असलेल्या भू संपादनाला त्यामुळे वेग येणार आहे.
सरकारकडून मिळालेल्या जमिनींचा भोगवटा वर्ग -२ मध्ये समावेश होतो. बाळकुम ते भाईंदरपाडा- गायमुख हा सुमारे १४ किमीचा खाडी लगतचा रस्ता ठाणे महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पात लागणारी बहुतांश जमीन ही भोगवटा वर्ग – २ मध्ये येते. या भागात बाळकूम (०४), कोलशेत (१०), कावेसर (२२) आणि वडवली (१७) असे एकूण ४९ भूखंडधारक आहेत. त्यापैकी बहुतांश गावातील शेतकऱ्यांनी टीडीआर करिता अर्ज केले आहेत.
ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी बाळकूम ते गायमुख कोस्टल रोड अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोस्टल रोडसाठी आवश्यक जमीन प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे. त्याचवेळी, ज्या भूखंडधारकांची, शेतकऱ्यांची जमीन कोस्टल रोडमुळे बाधित होत आहे अशा भूखंडधारकांना जमिनीच्या मोबदल्यात टीडीआरचे वाटप विनासायास होईल, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेत भूखंडधारकांना सर्वतोपरी सहकार्य करून लवकरात लवकर टीडीआर प्रमाणपत्र मिळवून देण्यास महापालिका कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन आयुक्त श्री. बांगर यांनी यावेळी केले.
रस्त्याखालील येणाऱ्या जमिनीच्या एकूण मूल्यांकनाच्या १० टक्के रक्कम महापालिका शासनाकडे जमा करणार आहे. तसेच, उर्वरित ९० टक्के विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) जमीन मालकाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. अशा प्रकारची प्रक्रिया राबविण्यात येत असून या योजनेनुसार कार्यवाही पूर्ण करून मोजे कावेसर येथील सर्व्हे नंबर २९३/९ चे भूखंडधारक सुलोचना चिमा मणेरा आणि इतर १० तसेच सर्व्हे नंबर २९४/८चे भूखंडधारक हरेश्वर मणीलाल डाकी व योगेश्वर मणीलाल डाकी यांना आयुक्त श्री. बांगर यांच्या हस्ते विकास हक्क प्रमाणपत्र देण्यात आले.
ही जमीन संपादन करण्यासाठी मोठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यात, भू संपादन करायचे असेल तर महसूल विभागाकडे जमीन मालकाला अधिमूल्य भरावे लागते. स्थानिक जमीन मालकांची तेवढी आर्थिक स्थिती नसल्यामुळे भूसंपादन प्रकियेत अडचणी येत होत्या. त्यामुळे, ही प्रक्रिया सुलभ करून जमिनीचे १० टक्के अधिमूल्य महापालिकेतर्फे शासनाकडे जमा करून, जमिनीच्या मोबदल्यात देय असलेल्या टीडीआरमधून तेवढी रक्कम वळती करून घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठविला होता. त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यास, मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर मान्यता मिळाली. त्याची अधिसूचना फेब्रुवारी -२०२३ मध्ये शासनाने काढली. त्यामुळे आता भोगवटा वर्ग -२ खालील भूखंडाचे भूसंपादन सुलभ झाले आहे.
या प्रकल्पात मौजे कावेसर आणि मोजे वडवली येथील बहुतांश सर्व्हे क्रमांक हे गोळा नंबर असल्याने पोटहिस्सा मोजणीची कार्यवाही सर्व भूखंडधारक यांच्या सहकार्याने ठाणे महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित भूखंडधारकांनी या कार्यवाहीत सहकार्य करून महसूल अभिलेखी सात बारा उताऱ्यानुसार आपल्या हिस्स्याची नोंद पोट हिस्सा मोजणी नकाशात करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त श्री. बांगर यांनी केले आहे. या पद्धतीने विकास हक्क प्रमाणपत्र प्रदान करण्यास सुरूवात झाली आहे. त्याचा फायदा सर्व भूखंडधारकांनी घ्यावा. त्यामुळे कोस्टल रोडचे कामही जलद मार्गी लागेल, असेही आयुक्त श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.
यावेळी, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुदाम परदेशी, सहाय्यक संचालक नगररचना श्री. सतीश उगीले, शहर विकास व नियोजन अधिकारी श्री. शैलेंद्र बेंडाळे आदी उपस्थित होते.