Saturday, April 20 2019 12:21 am

बालदिनानिमित्त शाळेतील मुलांना आरोग्यमंत्राचे धडे

बालदिनानिमित्त शाळेतील मुलांना आरोग्यमंत्राचे धडे 
स्थूल मुलांमध्ये आढळतोय मधुमेह 
 
ठाणे – मुंबई : १४ नोव्हेंबर रोजी येणाऱ्या बालदिन व मधुमेह दिनाचे औचित्य साधून मीरा रोड येथील रावल इंटरनॅशल स्कुल मध्ये वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे लहान मुलांमध्ये  योग प्रशिक्षण तसेच  पौष्टीक आहाराविषयी  जागृती आणण्यासाठी एका शिबीराचे आयोजन केले होते.  रावल इंटरनॅशल स्कुलच्या आवारात भरलेल्या या शिबीरात दीडशेहुन अधिक मुलांनी भाग घेतला होता. जीवनशैलीतील बदलामुळे प्रौढ व्यक्तींमध्ये मधुमेहाचे  वाढण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना लहान मुलेही मधुमेहाच्या कचाट्यात सापडत आहेत.योग्य आहार व शारीरिक तंदुरुस्तीद्वारे आजची पिढी जर सदृढ करावयाची असेल तर त्यांना जंक फूड, विडिओ गेम्स, मोबाईल, टीवी यापासून परावृत्त केले पाहिजे याच भावनेतून  वोक्हार्ट हॉस्पिटलने हे शिबीर आयोजित केले होते. यावेळी  वोक्हार्ट हॉस्पिटलच्या योग प्रशिक्षिका सुचित्रा यांनी  शारीरिक तंदुरुस्ती कशी ठेवावी याची प्रात्यक्षिके करून दाखविली, तसेच आहार तज्ञ नफिसा यांनी रोजच्या जेवणात काय खावे व खाऊ नये याचेही मार्गदर्शन केले. याविषयी अधिक माहिती देताना वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख रवी हिरवानी म्हणाले , ” एकत्रित कुटुंब व्यवस्था मोडकळीला आली असून आई बाबा नोकरीला गेल्यावर लहान मुलांना एकतर पाळणाघरात ठेवले जाते अथवा नोकरांच्या हवाली केले जाते. आपण आपल्या मुलांना वेळ देता नाही हीच खंत मनाशी बाळगून मुलांचे लाड करताना पालक मुलांना हवे असलेले पदार्थ खायला देत असल्यामुळे मुलांचे वजन वाढत जाते. भारतामध्ये आजच्या घडीला सुमारे २५ ते ३० टक्के  लहान मुले ही स्थूल आहेत. स्थूल असणा:या मुलांमध्ये टाइप २ मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. स्थूल मुलांपैकी सध्या १५ ते २० टक्के मुलांना मधुमेहाची लागण झाल्याचे आढळून येते. मात्र अजूनही या विषयाकडे पालक आणि समाज गांभीर्याने पाहत नाही. लहान मुलांच्या जीवनशैलीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले नाहीत, तर हे प्रमाण पुढील ५ वर्षात दुप्पट होण्याचा धोका जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. मधुमेह हा आजार प्रौढांना होणारा आजार आहे, यामुळे लहान मुले लठ्ठ असली तरी त्यांना होणार नाही हा मोठा गैरसमज आहे. मुलांमध्ये स्थूलता असल्यास ती कमी करण्यासाठी त्यांनी व्यायाम केला पाहिजे ही महत्त्वाची बाब आहे.”
 लहान मुलांच्या जेवणामध्ये  मेदयुक्त (फॅट), कबरेदके (कार्बाेहायड्रेट्स) यांचे प्रमाण कमी ठेवून प्रथिने (प्रोटीन), तंतूमय पदार्थ (फायबर) यांचे प्रमाण अधिक असणे  गरजेचे आहे. सगळ्या प्रकारच्या डाळी, उसळी, हिरव्या पालेभाज्या, सलाड, ताजी फळे आहारामध्ये असावा. याचबरोबरीने शीतपेय, हवाबंद पदार्थ, पॅक्ड फूड हानीकारक  का आहेत याची माहिती मुलांना दिली पाहिजे , अशी मत वोक्हार्ट हॉस्पिटलच्या आहारतज्ञ नफिसा यांनी व्यक्त केले.