काटेवाडी, २१: वाढत्या शहरीकरणाबरोबरच देशातील बांधकाम क्षेत्रातही अत्याधुनीक प्रयोग होताना दिसत आहे. बांधकाम क्षेत्रातला असाच एक आश्चर्यचकीत करणारा प्रयोग पुणे जिल्ह्यातील बारामतीत पाहायला मिळणार आहे. हा प्रयोग म्हणजे दोन मजली इमारत चक्क उचलून 9 फूट मागे नेण्यात येणार आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून उत्सुकतेपोटी ही प्रक्रिया पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.
काटेवाडी (ता.इंदापूर) इथं मुलाणी कुटुंबाने वडिलांची आठवण जोपसण्यासाठी रस्ता रुंदीकरणात जाणारी इमारत वाचवण्यासाठी हा प्रयोग करुन पाहण्याचं ठरवलं. त्यानुसार, रस्त्यामध्ये येणारी दोन मजली इमारत मूळ जागेपासून चक्क 9 फुट पाठीमागे सरकरविण्याच्या कामास सुरवात झाली आहे. सध्या ही इमारत मूळ जागेपासून 6 इंच उंच उचलण्यात आली असून 5 फुटापर्यंत उंच उचलून ती जॅक आणि चॅनेलच्या साहय्यानं पाठीमागे सरकवण्यात येणार आहे.
पालखी मार्गाचे रुंदीकरण
बारामती आणि इंदापूर तालुक्यात संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचं काम वेगानं सुरु आहे. महामार्गातील जमिनीचं अधिग्रहण झालं असून रस्त्यामध्ये येणाऱ्या इमारती पाडण्यात आल्या आहेत. याची नुकसान भरपाई संबंधितांना देण्यात आली आहे. काटेवाडी गावात पालखी महामार्गाचं काम वेगाने सुरु आहे.
काटेवाडी गावाजवळील मुलाणी कुंटुबानं मात्र एक अनोखा प्रयोग राबविण्यास सुरवात केली आहे. सुरुवातीला मुलाणी कुटुंबानं प्रतिकूल परिस्थितीत ‘आशियाना कॉम्प्लेक्स’ नावाची दुमजली इमारत रस्त्यालगतच्या आपल्या जागेत उभारली होती. ज्यांच्या इच्छेनं ही इमारत उभी राहिली ते दादासाहेब मुलाणी यांचं चार वर्षापूर्वी निधन झालं. (latest Marathi News)
पण आता हीच इमारत नेमकी पालखी महामार्गाच्या रुंदीकरण प्रकल्पात आली आहे. त्यामुळं इमारतीचा सुमारे ९ फुटचा भाग रस्त्यात जाणार असल्यानं मुलाणी कुंटुबाला इमारत पाडवी लागणार होती.
मात्र, वडिलांची ही स्मृती जपण्यासाठी तसेच इमारतीच्या माध्यमातून वडिलांची आठवण कायमस्वरुपी जतन करण्याची मुलाणी कुटुंबाची मोठी इच्छा होती.