Saturday, January 18 2025 6:36 am
latest

बारवी धरणातून ठाणे जिल्ह्याला होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, शनिवारी बंद

कल्याण, ०४ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, औद्योगिक , क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो. या आस्थापनांचा पाणी पुरवठा येत्या शुक्रवारी (ता. ६) दुरुस्तीच्या कामासाठी २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश पाटील यांनी दिली.

एमआयडीसीकडून येत्या शुक्रवारी बारवी धरणातून निघणाऱ्या गुरुत्व जलवाहिनीचे देखभाल दुरुस्ती आणि जांभूळ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील उन्नत्तीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी शुक्रवारी रात्री १२ वाजता ते शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत बारवी धरणातून सोडण्यात येणारा पाणी पुरवठा आणि जांभूळ जलशुध्दीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत डोंबिवली एमआयडीसी, २७ गावे, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, ठाणे औद्योगिक क्षेत्र, बदलापूर औद्योगिक क्षेत्र, कल्याण डोंबिवली पालिका, उल्हासनगर, अंबरनाथ पालिका, नवी मुंबई, मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि परिसरातील ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी, पालिकांनी पाण्याची पुरेशी उपलब्धता करुन ठेवावी. नागरिकांनी दोन दिवस पाणी जपून वापरावे. उद्योजकांनी पाण्याची तात्पुरती सुविधा करुन ठेवावी, असे आवाहन एमआयडीसीतर्फे करण्यात आले आहे.