ठाणे, 19 ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील उथळसर प्रभाग समितीमधील के-व्हिला पूल ते पंचगंगादरम्यान नाल्यावर ६७६ मी. लांबीचा पूल तयार करून मिसिंग लिंक बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे के-व्हिला राबोडीमार्गे कळवा-साकेतकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होणार असून रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. यामध्ये बाधित होणार्या नागरिकांचे पुनवर्सन तातडीने करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी (बुधवारी) झालेल्या बैठकीत संबंधितांना दिल्या.
तसेच या ठिकाणी फॅनिंग पद्धतीने रस्ता तयार केल्यास वाहतूक अधिक सुरळीत होणार असल्याने यासाठी आवश्यक असलेली जागा कारागृह विभागाकडून ताब्यात घेण्याबाबतही तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना शहरविकास विभागास या वेळी आयुक्तांनी दिल्या.
या ठिकाणी बांधण्यात येणार्या पुलाच्या कामाअंतर्गत कारागृहाकडील भागात पायाभरणीचे काम तसेच नाल्याच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असून राबोडीकडील बाजूस एकूण ४२४ बांधकामे बाधित होत आहेत, त्यापैकी २७६ बांधकामाचे पुनवर्सन करुन त्या ठिकाणी काम सुरू असल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली.
उर्वरित जागेवरील अंदाजे १५० बांधकामे बाधित होणार असून, अंदाजे ५० बांधकामांना तात्पुरते स्थलांतरीत करणे गरजेचे आहे. याबाबत सर्वेक्षण करून कोणत्या ठिकाणी तातडीने घरे उपलब्ध करून त्यांचे पुनवर्सन करणे शक्य आहे, याबाबतची पडताळणी करून येथील नागरिकांचे पुनवर्सन करण्याच्या सूचना उपायुक्त स्थावर मालमत्ता विभागास आयुक्तांनी दिल्या.