Tuesday, January 19 2021 11:55 pm

बाजार समित्यांच्या कत्तलखान्यातुन मुक्त झाला तरच…बळीराजा आत्मनिर्भर होईल. शेतकरी नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत

मुंबई :  पुर्वी राजेशाहीतील लुट समजुन यायची,पण लोकशाहीत ‘खळं’ लुटलं जात असतानाही आम्हाला उमगलं नाही. शेतकऱ्याला लुटणारा ‘गब्बर’ कळलाच नाही. तेव्हा, बाजार समित्यांच्या कत्तलखान्यातुन मुक्त झाला तरच ‘बळीराजा’ खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनेल. असे प्रतिपादन शेतकरी नेते माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी केले आहे. ठाण्यातील सरस्वती सेंकडरी स्कुलच्या सभागृहात रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ‘आत्मनिर्भर बळीराजा’ हे चौथे पुष्प सोमवारी सादर झाले.त्यावेळी ते बोलत होते. तत्पुर्वी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी प्रास्ताविकात, शेतकऱ्यांसाठी रक्ताचे पाणी करणारे नेते असे संबोधत खोत यांचा गौरव केला.

केंद्र सरकारने बनविलेल्या कृषी कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हितच साधले जाणार असताना गेले काही दिवस दिल्लीच्या तख्तावर आंदोलन सुरू असल्याच्या पाश्र्वभुमीवर सदाभाऊ खोत यांनी आपली भूमिका सोदाहरण विषद केली. हमीभावाने खरेदीची लेखी हमी सरकार देण्यास तयार असतानाही शेतकरी संपेल अशी अनाठायी भिती दाखवुन सुरू असलेल्या पंचतारांकित आंदोलनाला आता राजकिय वास येत आहे. कायदेच रद्द करा, असे म्हणणे झुंडशाहीचे द्योतक असल्याचे सांगून या माध्यमातून विरोधक दिल्लीचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. पुढे बोलताना त्यांनी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड सोडला तर,नंतरच्या राजेशाहीत बळीराजाची लूटच होत होती, ती लुट समजुन यायची. शोले चित्रपटातील ‘गब्बर’ गावात दवंडी पिटुन लुटायचा. मात्र, लोकशाहीत लुटणारे हे ‘गब्बर’ आपल्याला कळलेच नाहीत. राजकारण्यांनी या लुटीची व्यवस्थाच करून ठेवली आहे, आधी शेतकऱ्याच्या शेतमालावर लेव्ही लावली, नंतर झोनबंदी, तालुका, जिल्हा, प्रांत, राज्यबंदी आणि निर्यातबंदी केली. हे कमी म्हणुन परदेशातुन स्वस्त माल आयात करून इथले उत्पादन मातीमोल केले.त्यावर बाजार समित्या नेमुन नात्यागोत्यांना खरेदी-विक्रीचे परवाने देऊन सेस लावला.खरेदीदार तेच,व्यापारी तेच, अडते आणि दलालही तेच. यांच्यावर राजकारण्यांची माणसे संचालकपदी नेमुन बळीराजाची पिळवणुक केली जाते.खरेदी केलेला माल गोदामात सडवुन शेकडो कोटींचे घोटाळे करायचे. तेव्हा, बाजार समित्या म्हणजे कत्तलखाने असुन या कत्तलखान्यातुन शेतकरी मुक्त झाला तरच आत्मनिर्भर बनेल. ७० वर्ष हे सोसलत आम्हाला फक्त ७ वर्ष द्या.असे आवाहन करून शेतीत परकीय गुंतवणूक करण्यासाठी हे नवे कायदे असल्याचे खोत यांनी सांगितले.