Sunday, August 25 2019 12:25 am

बनावट परवान्याद्वारे गौणखनिज लुटणाऱ्या टोळीला अटक

ठाणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सही शिक्यांसह गौण खनिजांसाठी लागणारे बनावट परवाने बनविणाऱ्या टोळीचा खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 156 बनावट परवान्यांच्या दोन पुस्तिका जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

ठाण्यात खाडीतून व इतर ठिकाणाहून गौण खनिज उपसा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार गौण खनिज उत्खन करण्यासाठी परवाना घ्यावा लागतो. दरम्यान, कळवा मुंब्रा परिसरात खाडीतून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उपसा केला जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात खनिज परवान्यांची मागणी आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन गेल्या काही दिवसांपासून कळवा येथे बनावट परवाने विक्री होत असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप शर्मा यांनी मिळाली होती. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने 11 जुलै रोजी सापळा लावून विक्की विभीषण माळी, अब्दुल समद बहाउद्दीन खान या दोघांना अटक केली. या दोघांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत अशा प्रकारचे गौण खनिज उत्खननाचे बनावट परवाने बनवणारी पूर्ण टोळीच असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पद्माकर दत्ताराम राणे, शाजी वल्लील पून्नन , अरविंद सूर्यकांत पेवेकर, प्रशांत रघुनाथ म्हात्रे, धनसुख उर्फ लकी ईश्वरभाई सुतार , उमेश गजोधार यादव राजू माधव पवार, रवी वेदप्रकाश जैस्वाल या टोळीस बेड्या टोकल्या.