Wednesday, June 3 2020 10:39 am

बँक ऑफ महाराष्ट्रलाही 9.5 कोटींचा गंडा

मुंबई : पीएनबीच्या कर्ज घोटाळ्यानंतर देशातला चौथा बँक घोटाळा समोर आला आहे. सर्व घोटाळे समोर आल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रानेही कर्ज थकवणाऱ्या चार उद्योजकांविरोधात सीबीआयकडे तक्रार केली. बँकेच्या तक्रारीनंतर सीबीआयने चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.बँक ऑफ महाराष्ट्रने दिल्लीतील उद्योजक अमित सिंगलाविरोधात तक्रार दिली. तक्रारीनुसार, सिंगलाची कंपनी ‘आशीर्वाद चेन’ने बँक ऑफ महाराष्ट्राकडून 9.5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं, जे आतापर्यंत परत केलेलं नाही. या तक्रारीत अमित सिंगलासह त्याचे वडील रोशनलाल आणि आई सुमित्रा देवी यांच्यासह अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे.पीएनबीला साडे अकरा हजार कोटींचा गंडा घालून हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी देशातून फरार आहेत. तर रोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी यालाही बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सनेही एका उद्योगपतीविरोधात सीबीआयकडे तक्रार केली आहे आणि आता बँक ऑफ महाराष्ट्राचं हे प्रकरण समोर आलं आहे.