Thursday, August 22 2019 5:07 am

‘फ्लेमिंगो’च्या संपकरी कामगारांना राजन राजे यांच्याकडून प्रत्येकी दहा हजारांचे अर्थसहाय्य

पनवेल : ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांच्या हस्ते तळोजा एमआयडिसीतील ‘फ्लेमिंगो फार्मास्युटिकल लिमिटेड’ या कंपनीच्या संपकरी कामगारांना आगामी सण-उत्सव लक्षात घेता, नुकतीच एकूण २२ लाख रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे प्रदान करून त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात आले.

आपल्या न्यायहक्कांसाठी आणि गेली १२ ते १५ वर्षे कंत्राटी कामगार म्हणून तुटपुंज्या वेतनावर होणारी पिळवणूक नष्ट करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील तळोजा एमआयडीसीमधील ‘फ्लेमिंगो फार्मास्युटिकल लिमिटेड’ या कंपनीच्या दोनशेहून अधिक कामगारांनी सहा महिन्यांपूर्वी ‘धर्मराज्य पक्ष’प्रणीत ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या युनियनचे अधिकृत सदस्यत्व स्वीकारले, मात्र युनियन केली म्हणून कंपनी व्यवस्थापन आणि ठेकेदारांनी कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक सुरू केली, अखेर ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांच्या प्रखर व ज्वलंत नेतृत्वाखाली दि. ७ मे, २०१८ रोजीपासून कामगारांनी बेमुदत संप पुकारला असून, गेली साडेतीन महिने मुजोर कंपनी व्यवस्थापन आणि अन्यायी ठेकेदाराविरोधात कंपनीच्या कामगारांनी संघर्ष सुरू केला आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सव लक्षात घेता ‘फ्लेमिंगो’च्या एकूण २२० लढाऊ कामगारांना शुक्रवार, दि. १० ऑगस्ट रोजी प्रत्येकी दहा हजार अशी एकूण २२ लाख रुपयांची आर्थिक मदत राजन राजे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली. “कामगार सन्मानाने जगला, तरच कारखाना जगेल” असे वक्तव्य करून, यापुढे प्रत्येक कामगाराच्या न्यायहक्कांसाठी मी स्वतः रस्त्यावरचा संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही असे रोखठोक प्रतिपादन राजे यांनी यावेळी कामगारांना संबोधित करताना केले. याप्रसंगी ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष राजू सावंत, अण्णा साळुंखे, महासंघाचे महासचिव महेशसिंग ठाकूर, उपाध्यक्ष रामकांत नेवरेकर, धर्मराज्य महिला संघटनेच्या महाराष्ट्र समन्वयक स्वप्नाली पवार, सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणवादी अभ्यासक विक्रांत कर्णिक यांच्यासह भरत मते, दीपक पाटील, जयकांत कदम, पौर्णिमा सातपुते आणि दर्शना पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.