Saturday, April 20 2019 12:00 am

फेब्रुवारीमध्ये कल्याण ते नाशिक लोकल दृष्टिपथात येण्याची खात्री

मुंबई -: कल्याण-नाशिक आणि कल्याण-पुणे लोकल सेवेची चर्चा बराच काळापासून सुरू होती. आता हा प्रकल्प दृष्टिपथात आला आहे. कल्याण-नाशिक आणि कल्याण-पुणे  ठिकाणांना जोडण्यासाठी लोकल सेवा लवकरच सुरू होणार आहे.मध्य रेल्वेवर चालविण्यात येणाऱ्या लोकलपेक्षा या लोकलची विशेष बांधणी करण्यात आली आहे. अत्यावश्यक ब्रेक सीस्टिमसह, उच्चदाब शक्ती, इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट्स ट्रेनसह ३२ चाकांना पार्किंग ब्रेकची सुविधा या लोकलमध्ये असेल. बारा डब्यांची लोकल फेब्रुवारी महिन्यात कुर्ला कारशेडमध्ये दाखल होणार असून, यामुळे पुणे ते नाशिक येथील प्रवाशांना लवकरच या लोकल सेवेला लाभ घेता येईल.

सर्व स्थानकांवर थांबा
सीएसएमटी ते पुणे दरम्यानचे रेल्वे अंतर १९२ किमी तर सीएसएमटी ते नाशिक दरम्यानचे रेल्वे अंतर १७२ किमी आहे.
मुंबई ते नाशिक आणि मुंबई-पुणे अंतर कापण्यासाठी ३ ते ३.३० तासांचा अवधी लागणार.
कल्याण ते नाशिक आणि कल्याण ते पुणे अंतर कापण्यासाठी २ तासांचा अवधी लागणार.
नाशिक आणि पुणे दरम्यान सर्व स्थानकांवर लोकलला मिळणार थांबा. 

मध्य रेल्वेसाठी अशा प्रकारातील सहा ट्रेन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीतून बनविण्यात आल्या आहेत. यासह या लोकलची चाचणी याच फॅक्टरीत करण्यात आली आहे. पुढील चाचणीसाठी ही लोकल कुर्ला कारशेडमध्ये जानेवारी महिनाअखेर किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस दाखल होईल. या वेळी येथे चाचणी घेऊन लवकरच लोकल सेवा सुरू करण्यात येईल. सध्या सीएसएमटी स्थानक ते नाशिक अशी लोकल सेवा सलग नसून, त्याऐवजी सीएसएमटी ते कल्याण आणि कल्याण ते नाशिक व पुणे अशी लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत एवढा लांबचा पल्ला गाठण्यासाठी लोकल सेवा उपलब्ध नाही. १५० किमीपर्यंतच लोकल सेवा उपलब्ध असते. त्यापुढील अंतर कापण्यासाठी शौचालय, बाथरूम व इतर सुविधांची पूर्तता लोकलमध्ये करावी लागते. सध्यातरी लोकलमध्ये या सुविधा नाहीत.