Monday, March 8 2021 6:28 am

‘माझं मोदींवर प्रेम ,माझ्या मनात कटुता नाही’,राहुल गांधींच वक्तव्य.

पुणेः

एकमेकांवर कुरघोडी करणारे नेते निवडणूक जवळ आल्यावर कसे एक होतात हे जनतेला माहितीच आहे. आणि जर ती व्यक्ती एखाद्या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष असेल तर मग चर्चा तर होणारच.पंतप्रधानांनी ‘मन की बात’ केली म्हणून आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ‘प्यार की बात’ केली. तीही चक्क भर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारून.

‘ नरेंद्र मोदी यांच्यावर माझं प्रेम आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग नाही. पण ते माझा तिरस्कार करतात. अर्थात, त्यालाही माझी हरकत नाही’, असं टिप्पणी राहुल यांनी केली. मोदी हे द्वेषाचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षांनी केला. राहुल यांनी आज पुण्यातील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. शिक्षण, बेरोजगारी, ७२ हजाराचा ‘न्याय’, याबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आणि मोदी सरकारच्या अपयशावरही बोट ठेवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुक्त कार्यक्रमांमध्ये सहभागी का होत नाहीत? प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यांना त्याची उत्तरं द्यावीच लागतील.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकच्या बाजूनेच आपण असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. एअर स्ट्राईकचं श्रेय हे हवाई दलाचं, वैमानिकांचं आहे. पंतप्रधानांनी त्याचं राजकारण करणं दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

प्रियंका यांच्यासोबत माझं नातं खूप खास आहे. आजी आणि वडिलांच्या हत्येनंतर ती माझ्यासोबत होती. आम्ही एकत्र वाढलो. काही वेळा एकमेकांसाठी माघारही घेतली. तिने बांधलेली राखी मी तुटल्याशिवाय काढत नाही. लहानपणी आम्ही भांडायचो, पण आता नाही. ती मला गोडधोड खाऊ घालून जाड करण्याचा प्रयत्न करते. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, अशा हळव्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.