ठाणे, 14 : प्रशासकीय सेवेत काम करताना विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन व भूमिका कशी असावी. आपण समाजात काम करणार असल्यामुळे समाजाप्रती व नागरिकांप्रती कोणती भावना असावी याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मेहनत आणि संघर्ष फार महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी आपली आवड काय आहे हे ठरविणे महत्वाचे आहे, आवड व कल विचारात घेवून आपले ध्येय ठरविले तर नक्कीच यश मिळते असे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना नमूद केले.
महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या निर्देशानुसार चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य केंद्रात केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी 2022 या स्पर्धा परीक्षेत ठाणे व मुंबई परिसरातील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि संस्थेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व संवाद व विशेष व्याख्यानाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक महादेव जगताप, संस्थेचे प्राध्यापक सैय्यद मुझ्झामिल, मुख्याधापक शिंदे उपस्थित होते. सदर कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी 2022 या स्पर्धा परीक्षेतील जान्हवी साठे (AIR-127), अर्पिता ठुबे (AIR-214), सैय्यद मोहम्मद हुसेन (AIR-570), आयशा काझी (AIR-586) या यशस्वी विद्यार्थ्यांना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अर्पिता ठुबे म्हणाल्या, मी इंजिनिअरींग मध्ये पदवी घेतलेली असून, चार वेळा केद्रिंय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिलेली आहे. सद्य:स्थितीत भारतीय पोलिस सेवा (I.P.S) या पदावर कार्यरत आहे. दिल्लीतील वाझियाराम इन्स्टिटयुट मधुन 1 वर्षांचे प्रशिक्षण घेतलेले आहे. कोविड-19 या महामारीच्या अभ्यावर खुप भर दिला.. त्यामुळेच यूपीएससी च्या परीक्षेत AIR-383 हे स्थान मिळवून भारतीय नागरी सेवेत आय.पी.एस. या पदावर निवड करण्यात आली. भारतीय नागरी सेवेत आय.ए.एस. होण्याचे स्वप्न असल्याने, यूपीएससी 2022 या स्पर्धा परीक्षेत पुन्हा सहभाग घेऊन, AIR-214 या स्थानावर यश संपादन केले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दररोज स्व: अभ्यास (Self Studies ) करणे, अभ्यासात सातत्य राखणे, इंटरनेट व युटयुब वर उपलब्ध असलेल्या माहितीचा जास्तीत – जास्त उपयोग करुन घेणे फार महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आयशा काझी यांनी जोशी बेडेकर कॉलेज मधून शिक्षण घेतले असून चार वेळा केद्रिंय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिलेली आहे. यूपीएससी 2022 या परीक्षेत त्यांनी AIR-586 या स्थानावर यश संपादन केलेले आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, या स्पर्धा परीक्षेत CSAT मुळे अनेक विद्यार्थी अपयशी होतात. त्यामुळे CSAT चा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. यूपीएससी ही परीक्षा पास करणेकरीता प्रशिक्षणार्थींकडे Aptitude, Attitude, Officer Quality, त्रास दायक परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक असून, यूपीएससी करीता या बाबी फार महत्वाच्या आहेत. ठाणे महानगरपालिका संचालित सी.डी. देशमुख ही संस्था स्पर्धा परीक्षा क्षेत्रात फार उल्लेखनिय कामगिरी करीत असून, सदर संस्थेचा संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे. येथील सोयी-सुविधा उत्तम व दर्जेदार आहेत.
यूपीएससी ही साधी व सर्व सामान्य परीक्षा नाही. त्यामुळे आपल्याला या परीक्षेची उत्सुकता असणे फार आवश्यक आहे. त्यामुळे जलद गतीने विचार करणे, भितीवर मात करणे, परीक्षा पध्दती व अभ्यासक्रम समजून घेणे, विविध कौशल्य आत्मसात करणे, संयमी राहणे फार आवश्यक आहे. CSAT मध्ये उत्तीर्ण होण्याकरीता आवश्यक मेहनत घेणे आवश्यक असल्याचे जान्हवी साठे यांनी नमूद केले. यूपीएससी परीक्षेला अजिबात घाबरु नये, आज बाजारात या परीक्षेबाबत अनेक माहिती पुस्तके अगदी सहजरित्या उपलब्ध आहेत. ही परीक्षा उत्तीर्ण होणे करीता प्लॅनिंग, वेळेचे व्यवस्थापन, स्ट्रेस व्यवस्थापन करणे फार महत्वाचे आहे. एनसीईआरटी हा या परीक्षेचा पाया असल्याकारणाने जास्तीत-जास्त वेळा एनसीईआरटी वाचणे आवश्यक आहे. अभ्यासाच्या बरोबरीने मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिकेंचे देखील मुल्यमापन करणे आवश्यक असल्याचे सैय्यद हुसेन यांनी नमूद केले.
या व्याख्यानास ठाणे, नवी मुंबई व मुंबई शहरातील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून व्याख्यानाला आलेल्या प्रशिक्षणार्थींना हसत-खेळत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात सुसंवाद साधुन- प्रशिक्षणार्थींच्या मनातले अनेक समज व गैरसमज दुर करून यूपीएससी 2022 या स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांनी सी. डी. देशमुख या संस्थेतील प्रशिक्षणार्थीं/विद्यार्थ्यांना बहूमुल्य असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक सादर केले. भविष्यात संस्थेमार्फत पूर्ण करण्यात येणाऱ्या उदिदष्टांची माहिती दिली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गिरीश झेंडे यांनी केले.