प्रवासी संघटना, शाळाचालक, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्य़क्त केल्या भावना
‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’, चौथे सत्र
ठाणे 29 : ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव असावा यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सुरू केलेल्या ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ या उपक्रमाचे चौथे सत्र नुकतेच (23 जानेवारी) पार पडले. या सत्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या चर्चासत्रात शहरातील परिवहन सेवेत सुधारणा व्हावी, शालेय विद्यार्थ्यांसाठी 20 वर्षानंतर ठाणे शहर कसे असावे, विशेष मुलांसाठी निवारा घर, घनकचऱ्याची समस्या, शहरातील वाहतूक कोंडी या उपस्थित झालेल्या मुद्यांवर सर्वंकष चर्चा करण्यात आली असून अर्थसंकल्पात देखील समावेश करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय होईल असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
या चर्चासत्रात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. महेश बेडेकर, सरस्वती शाळेचे विश्वस्त सुरेंद्र दिघे, ठाणे जिल्हा प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ, दिव्यांग तसेच शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या श्यामश्री भोसले, समता विचार प्रसारक संस्थेचे जगदिश खैरालिया, नेत्रविकारतज्ज्ञ आणि आर. निसर्ग संस्थेच्या डॉ. लता घनश्यामनानी, प्लास्टिक विरोधी स्वयंसेवी संस्थेच्या अनुजा गुप्ते, पर्यावरण दक्षता मंचच्या सचिव संगीता जोशी, समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत, प्रवासी महासंघाचे सदस्य राजेश जाधव आदी उपस्थित होते.
ठाण्याचे नागरिकरण झपाट्याने वाढत आहे, शहरातंर्गत परिवहन सेवेकडे जीवनवाहिनी म्हणून पाहिले जाते. परंतु लोकसंख्येच्या मानाने बसची कमतरता आहे, आपण शहरातील रस्ते मोठे केले असले तरी आपण परिवहन वाहतूक सेवा सक्षम केलेली नाही, त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. परिवहन सेवेचे अपग्रेडेशन झाले पाहिजे, बऱ्याचवेळा अनेक बसेस अचानकपणे रद्द होत असल्याने प्रवाशांची विशेषत: नोकरवर्ग, विद्यार्थी यांची गैरसोय होते, अशाप्रकारे बससेवा का रद्द होते व परिवहन सेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. परिवहनच्या ताफ्यात ई-बसेस आणून आपण आधुनिककीकरणाचा अवलंब केल्याबाबत प्रवासी महासंघाच्यावतीने मिलिंद बल्लाळ यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार व्यक्त केले.
परिवहन सेवा सक्षम व सुरळीत करण्याच्या दृष्टीकोनातून रस्तेकामासाठी खर्च होणाऱ्या रकमेतील 10 टक्के रक्कम बाजूला ठेवून त्याचा विनियोग परिवहन सेवेसाठी करावा. यामध्ये लोकसंख्येच्या मानाने बसेस उपलब्ध करणे, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे असेही बल्लाळ यांनी नमूद केले.
तसेच शाळा महाविद्यालयांच्या वेळेनुसार विभागवार परिवहन सेवेचे नियोजन केल्यास त्याचा उपयोग निश्चितच शालेय विद्यार्थ्यांना होईल व साहजिकच शाळेपर्यत येणाऱ्या खाजगी वाहनांची संख्या कमी होईल या दृष्टीने नियोजन व्हावे असे सुरेंद्र दिघे यांनी नमूद केले. आज विविध कारणांमुळे प्रदुषण होत असते, महापालिकेने यासाठी अनेक उपाययोजना राबविल्यामुळे प्रदुषण कमी करण्यास आपण यशस्वी झालो आहोत तरी देखील अनेक वाहनचालक विनाकारण हॉर्न वाजवित असतात, त्यामुळे या लगत असलेल्या शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल यांना त्रास होत असतो, याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करुन यावर निर्बंध आणणे गरजेचे असल्याचे डॉ. लता घनश्यामनानी यांनी नमूद केले. तसेच काही वाहनधारक उलट्या दिशेने प्रवास करतात, यामध्ये अपघात होण्याची शक्यता असते, यावर कडक उपाययोजना करण्यासाठी महापालिका व वाहतूक नियंत्रण विभाग यांनी समन्वयाने काम करावे असा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.
तसेच शहरामध्ये विविध सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पार्किंग होत असल्याचे दिसून येते. आजही आपण पार्किंगबाबत मागे पडत आहोत. शहरातील मॉलमधील जागा पार्किंगसाठी उपलब्ध होईल् का याबाबत संबंधितांशी चर्चा करुन पार्किंगची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच तसेच शहरामध्ये मल्टिस्टोर पार्किंग उभारण्याबाबत या अर्थसंकल्पात तरतूद करावी. वाहतूकीचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने सिग्नल व्यवस्था सक्षम करावी असेही यावेळी मिलिंद बल्लाळ यांनी नमूद केले.
यावर्षीचा अर्थसंकल्प तयार करताना असताना आपण आपल्या नजरेतील बदलते ठाणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू केला, परंतु हे करत निश्चितच 20 वर्षानंतर ठाणे कसे असावे हे आजच्या विद्यार्थ्यांच्या नजरेतून बघणे देखील गरजेचे आहे. यासाठी ठाण्यात भव्य बालभवन उभारल्यास विद्यार्थ्यांना हक्काची जागा मिळेल, त्यात खेळणीघर, रंगमंच आदी व्यवस्था असावी. तसेच ठाण्यात उभारलेले हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे रुपांतर बालभवनात करावे अशी सूचना सरस्वती शाळेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी केली. तसेच ठाण्यातील विज्ञानकेंद्र कोरोना काळापासून बंद आहेत ते पूर्ववत सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली, अशाप्रकारचे विज्ञान केंद्र प्रभागनिहाय असावे तसेच महापालिका शाळांमध्ये शिकवणीमुक्त शाळा, साहसी खेळ असे उपक्रम राबवावेत.
चालणाऱ्यांच्या दृष्टीने शहरातील रस्ते, पदपथ यांची रचना असावी. सायकलस्नेही वाहतूक व्यवस्था तयार व्हावी, त्यासाठी जनसामान्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडून यावा लागेल, असे मत डॉ. महेश बेडेकर यांनी मांडले. तसेच, ठाणे शहराचे स्वत:चे एक संग्रहालय असावे त्यासाठी पालिकेने प्रयत्न करावेत, असेही डॉ. बेडेकर म्हणाले.
ठाण्यामध्ये झोपडपट्टीचे प्रमाण जास्त आहे, या विभागातील मुलांना मोठ्या वाचनालयांमध्ये जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही तरी वस्त्यांमध्ये वाचनालये, अभ्यासिका सुरू कराव्यात अशी मागणी समता विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरालिया यांनी केली.
महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी गरीब कुटुंबातील असतात, या विद्यार्थ्याना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. परंतु महापालिका शाळांतील शिक्षकांना इतर कामांचा बोजा मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे ते आपल्या पदाला न्याय देवू शकत नाही याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो तरी शिक्षकांना शिकवण्याचेच काम असावे असे मत समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत यांनी व्यक्त केले.
ठाणे महानगरपालिकेची आनंद दिघे जिद्द शाळा कार्यान्वित असून या माध्यमातून विशेष मुलांना शिक्षण देण्याचे काम करीत आहोत. परंतु ठाण्यातील विशेष मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, याचाही सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून निवारा कार्यशाळा उभारणे देखील गरजेचे आहे असेही दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या श्यामश्री भोसले यांनी नमूद केले.
ठाणे शहरातील कचरा गोळा व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपण प्रभावीपणे काम करत आहोत. परंतु एकत्रित होणाऱ्या कच-याचे ओला व सुका असे वर्गीकरण न करता सरसकट कचरा नागरिकांकडून दिला जातो, त्याचा त्रास सफाई कर्मचाऱ्यांना सुद्धा होतो. याबाबत प्रभावी जनजागृती करुन काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. लता घनश्यामनानी यांनी मांडले.
माझ्या नजरेतील बदलते ठाणे या उपक्रमाच्या चौथे सत्र पार पडले. आपण केलेल्या सूचनांचा विचार केला जाईल. या ठिकाणी परिवहन सेवा, घनकचरा, वाहतूक समस्या, शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचनालये, विशेष मुलांसाठी शेल्टर होम आदी विषय प्रामुख्याने मांडण्यात आले. घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, परंतु यासाठी नागरिकांची मानसिकता बदलणे देखील गरजेचे आहे. शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक बदल करण्यासाठी वाहतूक विभागाशी सतत चर्चा सुरू आहे, जे वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असतील अशांवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दंडात्म्क कारवाई करणेबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल. शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अस्तित्वातील विज्ञान केंद्र सुरू करण्याबाबत संबंधितांना निर्देशित केले जाईल. तसेच सेंट्रल लायब्ररीसाठी निश्चितच प्रयत्न केले जातील असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.