नाशिक, 27 : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देवळाली रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीमार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आली. कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी मंडळ रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय, राज्य प्रशासनाचे अधिकारी, बँक आणि पोस्ट ऑफिसचे अधिकारी आणि शाळकरी मुले, स्वयंसेवी संस्था इत्यादी संबंधित स्थानकांवर कार्यक्रमात सहभागी झाले होते.
संबंधित शहरातील विविध शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत स्टेशन नंतरच्या पुनर्विकासाच्या नियोजित स्वरूपाची चित्रफीत सर्व स्थानकांवर प्रदर्शित करण्यात आली.
रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या महत्त्वावर केंद्र शासनाने अनेकदा भर दिला आहे. या प्रयत्नातील एक मोठे पाऊल म्हणून, प्रधानमंत्री यांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी करण्यात आली. या स्थानकांमध्ये रूफ प्लाझा, सुंदर लँडस्केपिंग, इंटर मॉडेल कनेक्टिव्हिटी, सुधारित आधुनिक दर्शनी भाग, किड्स प्ले एरिया, कियॉस्क, उपहारगृह इत्यादी आधुनिक प्रवासी सुविधा असतील