Monday, January 27 2020 8:52 pm

प्रदीप शर्मा यांचा जाहीरनामा नालासोपारातील समस्यापीडितांच्या हस्ते प्रकाशित

नालासोपारा : माझे आश्वासन हेच माझे वचन आहे. इथल्या लोकांच्या समस्या मला खरंच दूर करायच्या आहेत. म्हणूनच मी ज्या लोकांचे प्रतिनिधित्व करतोय, ज्यांच्या समस्यांनी, वेदनांनी मला अस्वस्थ केलंय त्याच लोकांच्या हातून मला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करावासा वाटला, असे सांगत नालासोपारा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी स्थानिक पूरग्रस्त, वृत्तपत्र विक्रेते, रिक्षा चालक, अल्पसंख्याक आणि नाल्यात वाहून गेलेल्या अबू बकर या लहान मुलाचे वडिल जफर खान यांच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन गुरुवारी केले.
या वेळी व्यासपीठावर शिवसेनेचे पालघर संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, जिल्हा उपप्रमुख नवीन दुबे, माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष साटम, तालुकाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, भाजपा पदाधिकारी संजोग यंदे, युवासेना पालघर संघटक राहुल लोंढे, विधानसभा क्षेत्र प्रमुख जितू शिंदे आणि मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते.
जफर खान यांच्यासह पूरग्रस्त नारायण डांगे, वृत्तपत्र विक्रेता प्रकाश पाडावे, रिक्षाचालक अरविंद जाधव व तुकाराम सिद्धे, मोहमद अन्सारी यांनी जाहीरनाम्याचे प्रकाशन महायुतीच्या नेत्यांसमवेत केले.
या वेळी विरार मनवेलपाडा येथील एका इमारत प्रकरणी फसवणूक होऊन रस्त्यावर आलेल्या साक्षी तिर्लोटकर या महिलेनेही महापालिकेतील सत्ताधारी नेत्यांकडून मिळालेल्या विदारक वागणुकीची करूण कहाणी सांगितली.
इथल्या प्रत्येकाशी मी गेले काही दिवस बोलतोय. मी सांगायला हवं असं काही नाही. तुम्हालाही इथली परिस्थिती माझ्यापेक्षा चांगली माहितीय. म्हणूनच मूलभूत समस्या आणि विकास योजनांचा विचार आम्ही जाहीरनाम्यात केलाय, असे श्री. शर्मा म्हणाले.
इथल्या परिसर विकास योजनांवर कार्यवाही नक्कीच होईल, असे रवींद्र फाटक यांनी सांगितले. जे काही इथे घडून आलेले नाही ते घडून येईल, असे ते म्हणाले.