ठाणे, 19 : ही निवडणुक तुम्ही स्वत: लढत आहात असे समजा, या निवडणुकीतून तुमचे महापालिका निवडणुकीचे प्रगती पुस्तक तयार होणार आहे, गाफील राहू नका, प्रत्येक मतदारापर्यंत पोहचा त्यांना बाहेर काढा, मतदानाचा टक्का वाढवा अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाºयांना कानमंत्र दिला. महापालिका निवडणुका लवकरच येऊ घातल्या आहेत, त्यामुळे आताच्या प्रगती पुस्तकावर तुम्हाला तिकीट द्यायचे की नाही? हे निश्चित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि ठाण्यात भाजपच्या कार्यालयात महायुतीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, आदींसह शिंदे सेनेतील भाजपमधील माजी नगरसेवकांची उपस्थिती होती. शिंदे यांच्या खांद्यावर राज्याची जबाबादरी असल्याने ठाण्यात त्यांना फारसे फिरता आले नव्हते. किंबहुना सभा किंवा रॅलीतही सहभागी होता आले नव्हते. त्यामुळे पदाधिकाºयांना उर्जा देण्यासाठी आणि नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक महत्वाची मानली गेली. या बैठकीत शिंदे यांनी लोकसभेत नरेश म्हस्के यांना ज्या पध्दतीने मतदान झाले, त्याच पध्दतीने आता देखील आपल्याला काम करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. गाफील राहू नका, प्रत्येक मतदारापर्यंत जा, त्यांच्या पर्यंत व्होटल स्लिप पोहचल्या आहेत की नाही? याची माहिती घ्या, मतदारांना मतदान करण्यासाठी बाहेर काढा, मतदानाचा टक्का वाढवा असा कानमंत्रही त्यांनी दिला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मागे पडला आणि तुमच्या प्रभागात जर महायुतीच्या उमेदवाराला कमी मते मिळाली तर लक्षात ठेवा महापालिका निवडणुका लवकरच येतील, तेव्हा तुम्हाला तिकिटाला मुकावे लागेल, अशा शब्दांत शिंदे यांनी सोमवारी रात्री कार्यकर्त्यांच्या खाजगी बैठकीत तंबी दिली आहे. ही निवडणुक तुमचे प्रगती पुस्तक ठरविणारी असल्याने जोमाने कामाला लागा असा सल्लाही त्यांनी दिली.
ठाणे शहर विधानसभा मतदार संघात भाजपतर्फे संजय केळकर यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील काही माजी नगरसेवक नाराज झाल्याची चर्चा होती. त्यांची नाराजी देखील शिंदे यांनी दूर करत महायुतीसाठी एक – एक जागा महत्वाची आहे. महायुतीतील पक्षांच्या नगरसेवकांनी पदाधिकाºयांनी सोबत काम करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.