Wednesday, October 23 2019 5:08 am

प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून राज्यातील प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी  म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून  घरे उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सोलापूर येथील श्रमिक पत्रकारांसाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, पुणे व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात 238सदनिका बांधकामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  झाले.  तसेच  यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण व वृक्षारोपण करण्यात आले.  यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पत्रकारांच्या कल्याणासाठी पत्रकार सन्मान योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना या योजनेच्या माध्यमातून निश्चितच दिलासा मिळेल.  राज्य शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.  या योजनेचा लाभ राज्यातील पत्रकारांना होणार असल्याचे सांगतानाच 1100 आजारांवर या योजनेच्या माध्यमातून उपचार मिळणार  आहेत.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाला गौरवपुर्ण इतिहास आहे. पत्रकार संघाने समाजजागृतीचे मोठे कार्य केले आहे. सोलापूर पत्रकार संघाच्या रुपाने महाराष्ट्रात गृहनिर्माणाची ही पहिली योजना आज कार्यान्वित झाली. त्यामुळे पुढच्या योजना नक्कीच सुकर होतील. सोलापूरच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकारांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी योजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यात लाखो गरीब कुटुंबांना घरे मिळाली आहेत.   2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर मिळवून देण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न राज्यात लवकरच साकार होईल. प्रत्येकाला घर मिळवून देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास  श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. बाजारभावाच्या तुलनेत म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणे आवश्यक आहे. तसेच या घरांसोबतच पत्रकारांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत सदनिकांच्या किंमतीही कमी करण्याबाबतचा निर्णयही लवकरच घेण्यात  येईल. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभा राहत आहे, ही आनंदाची बाब आहे. या गृहनिर्माण प्रकल्पाच्या माध्यमातून पत्रकारांचे हक्कांच्या घराचे स्वप्न निश्चितच पुर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.