ठाणे (17) -आपल्या असामान्य लेखन कर्तृत्वाने आणि विलक्षण प्रतिभेने मराठी साहित्य विश्वात मुशाफिरी करणारे, शिक्षक, कवी, गीतकार, विनोदकार, पटकथाकार, विडंबनकार, नाटककार, वक्ता, चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार, बालवाङमयकार, शिक्षणतज्ज्ञ अनुवादक, राजकीय पुढारी आणि पत्रकार म्हणून ज्यांनी केलेली कामगिरी अजोड ठरली, त्यांनी केलेल्या या भूमिके “लार्जर दँन लाइफ होत्या, अशा अष्टपैलू आचार्य अत्रे यांचे वर्णन करताना अफाट हा शब्द योग्य ठरतो. त्यांनी महाराष्ट्राला प्रतिभेच्या दहामुखांनी भरभरून दिले, असे गौरवोद्गगार महाराष्ट्र टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार लेखक श्रीकांत बोजेवार यांनी आज येथे काढले.
ठाणे महानगरपालिकेतर्फे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जयंती निमित्ताने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित विचारमंथन या व्याख्यानमालेत महाराष्ट्र टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी ‘आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे व्यक्तिमत्त्व आणि विचार’ या विषयावर आपले विचार मांडले. यावेळी ठाणेकरांच्यावतीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी श्रीकांत बोजेवार यांचे ग्रंथबुके, शाल व त्यांचे रेखाचित्र देवून स्वागत केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे उपस्थिथत होते. कार्यक्रमास कवयित्री अनुपमा उजगरे, आनंद विश्व गुरूकुलचे विश्वस्त प्रा. प्रदीप ढवळ, चित्रकार किशोर नादावडेकर, नवीमुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, जोशी बेडेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल नारायण बारसे, प्रभात चित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष पाठारे, ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान, समर्थ सेवक मंडळाचे अध्यक्ष डॉ . चैतन्य साठे, ईएनटी सर्जन डॉ. प्रदीप उप्पल उपस्थित होते.
आचार्य अत्र्यांचा मूळ पिंड शिक्षकाचा. त्यांना ‘आचार्य’ ही पदवी याच क्षेत्राने मिळवून दिली. मुंबईत काही दिवस शिक्षकाची नोकरी केल्यानंतर ते पुण्याला परतले आणि ‘कॅम्प एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेत महिना पस्तीस रुपये एवढ्या पगारावर हेडमास्तर म्हणून नोकरीला लागले. पुढे त्यांनी बीटी ही शिक्षणशास्त्राची पदवी घेतली, लंडनला जाऊन टीचर्स डिप्लोमाही केला. ‘कॅम्प एज्युकेशन सोसायटी’चा अत्र्यांनी केलेला कायापालट, मुलींच्या शिक्षणासाठी काढलेली ‘आगरकर हायस्कूल’ ही त्यांची शिक्षण क्षेत्रातील कामे महत्त्वाची असली, तरी ती पुण्यापुरती मर्यादित होती. मात्र, प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी लिहिलेली ‘नवयुग वाचनमाला’ आणि दुय्यम शाळेसाठीची ‘अरुण वाचनमाला’ ही क्रमिक पुस्तके म्हणजे मराठी भाषेवर उमटलेला खास ‘अत्रे ठसा’ होय. लंडनला गेले असता, तेथील क्रमिक पुस्तके पाहून त्यांना आपल्या येथील पुस्तकांचे तोकडेपण लक्षात आले. परत आल्यावर त्यांनी रटाळ सरकारी क्रमिक पुस्तकांची कल्पना मोठ्या प्रयासाने मोडीत काढली. त्यानंतर साधारण पंचवीस वर्षे महाराष्ट्रातील विद्यार्थी वर्ग ‘नवयुग वाचनमाले’च्या बौद्धिक खुराकावर पोसला गेला. शिवरामपंत परांजपे, अच्युतराव कोल्हटकर, विनोबा भावे, साने गुरुजी अशांच्या विचारांचे संस्कार कोवळ्या वयात करून, या वाचनमालेने घडविलेल्या विद्यार्थीवर्गानेच पुढील तीन-चार दशके महाराष्ट्राचे पुरोगामित्व सार्वजनिक जीवनात टिकवून ठेवले. साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, मंगेश पाडगावकर यांच्यासारख्यांनी या वाचनमालेसाठी लेखन केले असल्याचे श्री. बोजेवार यांनी नमूद केले.
अत्र्यांनी लिहिलेली विनोदी नाटके मानवी वृत्ती-भाष्य करणारी आहेत. ती त्यांच्या खास विनोदी शैलीमुळे, हास्यस्फोटक प्रसंगांमुळे आणि संवादांमुळे कोणत्याही काळात तेवढीच हसवतात, अंतर्मुख करतात. ‘साष्टांग नमस्कार’ सह ‘भ्रमाचा भोपळा’, ‘लग्नाची बेडी’, ‘मोरूची मावशी’, ‘कवडीचुंबक’, ‘पराचा कावळा’, ‘मी उभा आहे’ ही विनोदी नाटके, ‘तो मी नव्हेच’, ‘घराबाहेर’, ‘उद्याचा संसार’, ‘जग काय म्हणेल’, ‘प्रीतीसंगम’, ‘पाणिग्रहण’ ही इतर वेगवेगळ्या प्रवृत्तीची नाटके अत्रेंनी लिहली. १९३५ मध्ये अत्रेंनी लिहलेल्या ‘ ‘घराबाहेर’ या नाटकाला होत असलेली गर्दी पाहून त्यांना ‘हाउसफुल्ल’ हा शब्द सुचला व त्यांनी तो जाहिरातीत वापरला.
विश्राम बेडेकर यांनी विश्राम दिग्दर्शित केलेला, १९४१मध्ये प्रदर्शित झालेला ‘नारद नारदी’ आणि ‘ठकीचे लग्न’ या चित्रपटांसाठी संवाद लिहिताना अत्र्यांना चित्रपट लेखनाच्या तंत्राची ओळख झाली होती; तरीही त्यांना या माध्यमाचा फार ओढा नव्हता. बाबूराव पेंढारकरांनी ‘हंस पिक्चर्स’साठी विनोदी चित्रपट लिहिण्याची गळ घातली; त्यातून १९३७मध्ये अत्र्यांनी ‘धर्मवीर’ चित्रपट लिहिला आणि चित्रपटसृष्टीत आधी तात्पुरती उमटून गेलेली पावले पुढे दमदारपणे रोवली गेली. या यशानंतर पाठोपाठ ‘ब्रह्मचारी’ आणि त्यानंतर ‘ब्रँडीची बाटली’ या चित्रपटांनी एक प्रकारे यशाची ‘अत्रे चित्रत्रयी’ निर्माण झाली. त्यानंतर अत्र्यांनी चित्रपटांकडे मोर्चा वळवून, दिग्दर्शनाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा एखादा धंदेवाईक विषय न घेता ‘श्यामची आई’ सारखा विषय घेतला, हेच त्यांचे मोठेपण आहे. या चित्रपटाला मिळालेल्या राष्ट्रपती पदकाने आणि पाठोपाठ महात्मा जोतिबा फुले यांच्यावरील ‘महात्मा’ या चित्रपटाला रजत पदक मिळाल्याने, अत्रे या नावाला चित्रपटसृष्टीत सुवर्णझळाळी मिळाली असल्याचेही श्री. बोजेवार यांनी नमूद केले.
कर्तृत्वाच्या सर्वच क्षेत्रांत त्यांचा प्रवेश योगायोगाने आणि नाट्यपूर्ण पद्धतीने झाला; तेच पत्रकारितेबाबतही झाले. ‘राष्ट्रीय सुविचार प्रसारक मंडळी’च्या ‘लोकशक्ती’ या दैनिकाची व्यवस्थापक मंडळी बदलली, त्यांनी आधीच्या संपादकीय कर्मचाऱ्यांची जबाबदारी नाकारली. त्यांना काम देण्यासाठी म्हणून अत्र्यांनी जानेवारी १९४० मध्ये साप्ताहिक नवयुग’ सुरू केले. साधारण १९४६-४७मध्ये अत्रेचा काँग्रेसशी खटका उडाला. ‘नवयुग’ सुरू असतानाच, १९५६ मध्ये काळाच्या गरजेतून आणि अत्र्यांच्या आयुष्यातील नाट्यपूर्ण योगायोगांना शोभेल अशाच पद्धतीने ‘दैनिक मराठा’चा जन्म झाला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या काळात धडाडलेली अत्रे तोफ, त्या तोफेत त्यांनी ठासून भरलेले वक्तृत्वाचे आणि लेखणीचे गोळे, त्यांनी उद्ध्वस्त केलेले विरोधकांचे बुरूज हा इतिहास अवघ्या महाराष्ट्राचा आहे, ‘अन्यायाने संतप्त झालेल्या तीन कोटी मराठी जनतेला वाघ नखे फुटतील आणि द्विभाषिकाचा कोथळा बाहेर काढला जाईल…’ अशा जळजळीत शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसकडे पाठ फिरवून समाजवादाची कास धरली. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यावर पुन्हा त्यांची साथसंगत सुटली. सन १९५७मध्ये आमदारकीची निवडणूक निवडूनही आले.
माटे- अत्रे, फडके- अत्रे, ठाकरे-अत्रे, वरेरकर-अत्रे अशा अनेक वादांमध्ये अत्र्यांनी वापरलेली भाषा, केलेल्या कोट्या बरेचदा सभ्य पत्रकारितेच्या चौकटीत न बसणाऱ्या होत्या. हे सगळे केवळ ‘अत्रे म्हणून’ लोकांनी चालवून घेतले; कारण ते ज्या लोकांचे वाभाडे काढत, त्या व्यक्तींमधील गुणांचेही त्यांना नेमके भान असे, जाण असे. तशी वेळ आली, तर ते त्याच व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचत, याचीही शेकडो उदाहरणे असल्याचे श्री बोजेवार यांनी नमूद केले. १९५५ ते १९६० या काळातले अत्रे हा आक्रमक चैतन्याचा धबधबाच होता. त्या धबधब्याचे काहींवर तुषार उडाले, काहींवर शिंतोडे उडाले, काही त्यात चिंब भिजले, तर काहींच्या नाका-तोंडात पाणी गेले. त्यांचा स्नेह, त्यांचा रोष, त्यांचे राग-लोभ सगळेच टोकाचे असे आणि अनेकदा ते तात्पुरते असे.
आप्तस्वकीयांचे मृत्यू, पुरस्कार, टीका, कौतुक आणि आयुष्याकडून भरभरून घेण्याची, त्याला भरभरून देण्याची मनस्वी वृत्ती हे अत्रेंच्या वाट्याला सगळेच ‘कऱ्हेचे पाणी’ या आत्मचरित्राचा पाचवा खंड प्रकाशित झाल्यावर अवघ्या दहा महिन्यांनी, १३ जून १९६९ रोजी, वयाच्या ७१व्या वर्षी आचार्य अत्रे यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी उलगडलेला अत्रेंचा प्रवास ऐकताना जणू सर्व सभागृहच अत्रेमय झाले होते.