मुंबई28: बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून सहा वर्षांखालील बालकांना, गरोदर महिलांना, स्तनदा मातांना पोषण आहार दिला जातो. त्यासाठी प्रतिलाभार्थी आठ रुपये मानधन देण्यात येते, त्यामध्ये वाढ करून १२ रुपये मानधन देण्यात यावे अशी विनंती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची भेट घेऊन केली.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, पोषण आहार प्रतिलाभार्थी १२ रुपये दरवाढ दिली तर बालकांना चांगला आहार आणि बचतगटांना आर्थिक मदत होईल. तसेच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात राज्य हिस्सा प्रमाणे केंद्राचा हिस्सा मिळाला तर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करता येईल.
विविध लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार राज्यात नवीन आठ हजार ८४ अंगणवाड्यांची मागणी असून यासाठी मान्यता देण्याबाबतचा प्रस्तावही केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे मंत्री तटकरे यांनी दिला. तसेच अंगणवाडीमध्ये सध्या जी वृद्धी सहनियंत्रण साधने ( Growth monitaring Devices) वापरण्यात येत आहेत. ती जुन्या पद्धतीची असून आयआयटीने विकसित केलेले अद्ययावत इलेक्ट्रॉनिक वृद्धी सहनियंत्रण साधने तातडीने उपलब्ध करून देण्यात यावीत. या साधनांचा वापर केला तर कामामध्ये सुलभता, अचूकता येईल आणि वेळेची बचतही होईल. महिलांची सुरक्षा सुधारण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांना निर्भया अंतर्गत केंद्र शासनाकडून जो निधी दिला जातो तो तातडीने देण्यात यावा. अशी विनंतीही मंत्री कु. तटकरे यांनी केंद्रीय मंत्री यांना केली.
नोकरीसाठी अनेक महिलांना त्यांचे घर सोडून नोकरीच्या ठिकाणी त्यांना राहावे लागते. अशावेळी नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित व सोयीस्कर निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या मिशन शक्ती उपक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागाकडून सखी निवास ही योजना राबविण्यात येते. या योजनेसाठी केंद्राकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी विनंतीही मंत्री तटकरे यांनी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे केली.