मुंबई, 28 : अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन महसूल वाढीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रभावीपणे काम करीत असतात. पोलीस विभागाप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील गुणवत्ता पूर्ण कार्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांना पदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उत्पादन शुल्क विभागातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजनाबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी , उपसचिव युवराज अजेटराव यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री देसाई म्हणाले की, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामाबाबत गौरव केला की त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. विभागाच्या राज्यस्तरीय गौरव सोहळा कार्यक्रमाबाबत नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.