Tuesday, April 23 2019 10:09 pm

पोलिसांना हि होणार घरांचा फायदा !

ठाणे-: ठाण्यातील वर्तकनगर भागातील मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाची तयारी म्हाडाने दर्शवली आहे . ह्या प्रस्तावास ठाणे पोलिसांकडून मान्यता मिळाल्यानंतर पुनर्विकास सुरू होणार आहे. प्रस्तावानुसार १० इमारतींच्या जागेवर ३० मजली इमारती उभारून त्यात पोलिस विभागाला वाढीव क्षेत्राच्या ५६० घरे विनामूल्य दिल्या जाणार आहेत. याशिवाय, तब्बल एक हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार, असून त्यांच्या विक्रीतही पोलिसांना प्राधान्य दिले जाणार आहे.
          शहराच्या अनेक भागांत ठाणे पोलीस विभागाच्या वसाहती असून वर्तकनगरात ११ इमारती आहेत. या इमारती मोडकळीस आल्या असून त्यांचा पुनर्विकास गेल्या काही वर्षांपासून रखडला आहे. या संदर्भात संबंधित विभागाच्या बैठकाही झाल्या होत्या. मात्र त्यामध्ये पुनर्विकासाबाबत ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर गेल्या महिन्यात ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, आमदार सरनाईक आणि म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
        वर्तकनगर या मोक्याच्या ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध होणार आहेत. संबंधित विकासकाकडून वर्तकनगर पोलीस ठाणे आणि सहायक आयुक्त कार्यालयाचे बांधकामही केले जाणार आहे. या प्रस्तावामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाचा रखडलेला प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
       वर्तकनगर भागातील पोलीस विभागाच्या वसाहतीमधील इमारती तीन ठिकाणी आहेत. त्यामुळे म्हाडामार्फत तीन स्वतंत्र प्रस्ताव नियोजन प्राधिकरणाकडे सादर करण्यात येणार आहेत. तीनपैकी दोन प्रस्तावांचे क्षेत्रफळ २० हजार चौ.मी. इतके होणार आहे. पर्यावरण विभागाची मंजुरी आणि नॅशनल बोर्ड ऑफ वाइल्ड लाइफचे ना हरकत प्रमाणापत्र म्हाडाला घ्यावे लागणार आहे. ३० मजली इमारती उभारण्यात येणार असून त्यापैकी ५५६ सदनिका पोलीस विभागाला विनामूल्य देण्यात येणार आहे. तर चार सदनिका मूळ खासगी सदनिका मालकांना देण्यात येणार आहेत.
      या प्रस्तावानुसार ४४.०५ चौ.मी. चटई क्षेत्रफळाच्या घरांचा आकार वाढवून ४५ चौ.मी. करण्यात येणार आहे. अशा ४० सदनिका बांधल्या जाणार आहेत. ३३.८९ चौ.मी. चटई क्षेत्रफळाच्या १२० सदनिकांचा आकार वाढवून त्या ४५ चौ.मी. करण्यात येणार आहे. तर १४.५५ चौ.मी. चटई क्षेत्रफळाच्या ४०० सदनिकांचा आकार वाढवून ३० चौ.मी. करण्यात येणार आहे.