Thursday, December 5 2024 6:29 am

पैसे घेऊन घरे देण्यास टाळाटाळ ; विकासकावर होणार कारवाई

आमदार संजय केळकर यांच्या मागणीची उपमुख्यमंत्र्यांकडून दखल

मुंबई – २६ :सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे घेऊन इमारतीची एकही वीट न रचता फसवणूक करणाऱ्या विकासकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

आमदार संजय केळकर यांनी सभागृहात ठाण्यातील विकासकांकडून होत असलेल्या फसवणुकीचा मुद्दा उचलून घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला. मुंबईप्रमाणेच ठाण्यातही विकासकांचा धुमाकूळ सुरू आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय ठाणेकरांनी हक्काच्या घराचे स्वप्न पाहत गृहकर्जे घेऊन विकासकांना पैसे दिले, मात्र इमारतीची एकही वीट रचली गेली नसल्याचे आ. केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. एकीकडे पैसे घेऊन इमारतीचे बांधकाम केले जात नाही तर दुसरीकडे हेच विकासक दुसऱ्या कंपनीच्या नावाने इमारती बांधत असल्याचे दिसून येत असल्याचेही श्री.केळकर यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात अशा तीन विकासकांनी ग्राहकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत तर एका विकासकाविरोधात तब्बल १८ गुन्हे दाखल आहेत. अशा विकासकांविरुद्ध कठोर कारवाई करून गृह कर्जाचे हप्ते भरून हतबल झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची मागणी श्री.केळकर यांनी केली.

यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तक्रारीची दखल घेत संबंधित विभागांना सूचना केल्या. रेरा कायदा येण्यापूर्वी विकासकांचे अनेक फसवणुकीचे प्रकार होत होते, रेरा कायदा आल्यानंतर हे प्रकार कमी झाले आहेत. मात्र यापुढे फसवणुकीच्या तक्रारी आल्यास आर्थिक गुन्हे शाखेसह अन्य विभागांनी यावर कडक कारवाई करावी. गरज भासल्यास एसआयटी स्थापन करून चौकशी केली जाईल, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले.