Friday, December 13 2024 10:48 am

पैगंबरसाहेबांचा अवमान करणार्‍या नुपूर शर्माला अटक करा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पोलीस आयुक्तांकडे मागणी.

देशाने नव्हे, तर भाजपने माफी मागावी- शानू पठाण.

ठाणे : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानामुळे देशाची जगभर बदनामी होत आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी गृहनिर्माण मंत्री ना. डॉ.जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कळवा- मुंब्रा अध्यक्ष तथा मा. विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची भेट घेतली. दरम्यान, नुपूर शर्मा यांनी चुकीच्या पद्धतीने विधाने करुन जगाचा भारताप्रती रोष वाढवून घेतला आहे. त्यामुळे भाजपने जगभरातील इस्लाम धर्मियांची माफी मागावी, अशी मागणी यावेळी शानू पठाण यांनी केली.नूपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य टीव्ही वाहिनीवरील चर्चेत केलं होतं. नूपूर शर्मा यांच्या विरोधात कलम भादंविच्या 295 अ, 153अ आणि 505 ब अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांना अटक करावी, या मागणीसाठी शानू पठाण, मर्जिया पठाण यांच्यासह सामाजिक संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने नुपूर शर्मा यांना जरी भाजपने निलंबित केले असले तरी त्यांच्यामुळे देशाची प्रतिमा जगभर डागाळली आहे. त्यामुळे कानपूरसारखी घटना घडू नये, महाराष्ट्रात शांतता कायम रहावी, यासाठी त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली.

या प्रसंगी पठाण यांनी,शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात चुकीची आणि अवमानजनक विधाने केली होती. या प्रकरणी मुंब्रा, भिवंडी आणि मुंबईमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेली आहे. तसेच, 31 मे रोजी मुंब्रा येथे आंदोलन करुन शर्मा यांना अटक करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापही त्यांना अटक करण्यात आलेली नाही. नुपूर शर्मा यांनी जे विधान केले. त्यामुळे जगभरात भारताची प्रतिमा मलिन झालेली आहे. कानपूर येथे घडलेली घटना किंवा तेथील दंग्यांस नुपूर शर्मा याच जबाबदार आहेत. त्यांनी जर मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात असे विधान केले नसते; तर, असे दंगे उसळलेच नसते. त्यामुळे जातीय-धार्मिय दंगा भडकविण्यास भाजप आणि नुपूर शर्मा हे दोघेच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच देशाची मान जगात शरमेने खाली गेली आहे. त्यामुळे शर्मा आणि भाजपने देशवासियांची आणि जगाचीही माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच, ठाणे पोलिसांनी शर्मा यांना तत्काळ अटक करावी, अशा मागणीचे निवेदन देऊन या मागणीसाठी ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांनाही निवेदन देण्यात येणार आहे, पठाण यांनी सांगितले.