Tuesday, January 19 2021 11:38 pm

पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार

ठाणे : अच्छे दिनचे स्वप्न दाखवित केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात महागाईचा आगडोंब उसळविला आहे. पेट्रोल पंप म्हणजे ‘मोदी वसुली केंद्र’ झाले आहेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येत्या गुरुवारी  ठाण्यातील एक हजार कार्यकर्ते ठाणे ते मुंबई असा सायकल प्रवास करीत भाजपच्या प्रदेश कार्यालयावर धडक देणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर यांनी दिली.
पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असून, सध्या पेट्रोलने नव्वदी पार केली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केल्यामुळे पेट्रोलियम कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बदल करीत असतात.  पेट्रोलची मूळ किंमत कमी असताना जास्त दराने विक्री करून जनतेची आर्थिक लूट केली जात आहे. रोजच्या रोज दरवाढ करण्याऐवजी तीन महिन्यांनी दरांमध्ये फरक करावा. पेट्रोल-डिझेलचे इतर कर काढून वस्तू व सेवा कराच्या कार्यकक्षेत घ्यावे, तसेच महाराष्ट्र व लगतच्या राज्यातील पेट्रोल-डिझेलची किंमत एकसमान करावी अशा मागण्या अनेकवेळा करण्यात आलेल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात केंद्र सरकार माहिर झाले आहे.
आजवर केलेल्या आंदोलनांची निवेदने जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना पाठविण्यात आलेली आहेत. मात्र, त्यांची दखल घेतली जात नसल्याने आता भाजपच्या प्रदेश कार्यालयावर सायकल चालवित धडक देण्याचा निर्धार राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. भाजप कार्यालय गाठल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची भेट त्यांना इंधनाची दरवाढ कमी करण्यासाठी पंतप्रधानांवर दबाव आणावा, अशा आशयाचे निवेदन देणार आहेत.  या आंदोलनात सुमारे एक हजार सायकलस्वार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असेही खामकर यांनी सांगितले.