Saturday, November 16 2019 4:48 am
ताजी बातमी

पूरग्रस्तांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा निधी वस्तूस्वरूपात

ठाणे :- महापुराचे संकट ओढवलेल्या कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक सामाजिक संघटना पुढे येऊ लागल्या आहेत. अशाचप्रकारे साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक उत्सव समितीने देखील कोल्हापूर- सांगली या पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. अण्णाभाऊ साठे यांची यंदाची जयंती रद्द करण्यात आली असून महोत्सवाला लागणारा संपूर्ण खर्च पूरग्रस्तांना गृहपयोगी वस्तूच्या स्वरूपात देण्यात येणार असल्याचे यावेळी समितीच्या वतीने सांगण्यात आले.
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा,कोल्हापूर,सांगली या पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे अनेक नागरिकांच्या घरात नुकसान झाले आहे. दरम्यान त्याचा संसार पुन्हा सुरळीत करण्याच्या उद्देशाने अनेकांनी मदत देण्याचे ठरवले असताना राज्यातून अनेक मदतीचा पूर सुरू झाला आहे. दरम्यान ठाण्यातील अण्णाभाऊ साठे सार्वजनिक उत्सव समितीने जयंती महोत्सवाला लागणार 5 लाख रुपयांचा निधी पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे, यामध्ये नागरिकांना लागणाऱ्या गृहपयोगी वस्तू स्वरूपात कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात वाटप करण्यात येणार आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 99 वा सुवर्ण महोत्सवी जयंती सोहळा साजरा करण्यात येणार होता. परंतु महाराष्ट्रावर पावसाळी महापुराचे संकट आले असताना माणुसकीच्या दृष्टीकोनातून समितीने एकमताने निर्णय घेण्याचे ठरवले. दरम्यान जयंती महोत्सवाचा निधी वस्तुस्वरूपात पूरग्रस्तांना वाटप करण्यात यावा असे निवेदन ठाणे पालिकेच्या महापौर मिनाक्षी शिंदे आणि पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना देण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक आवारे,कार्याध्यक्ष मंगेश सुर्यवंशी, सचिव राजभाई सुर्यवंशी,समीर नेटके आदी जण उपस्थित होते.