Wednesday, February 26 2020 9:46 am

पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

पुणे :- आम्हाला हवी विकासाची गाडी, नको आम्हाला चंपा साडी’ अश्या घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी साडय़ा वाटल्याचा निषेध करण्यात आला. पुण्यातील खंडोजीबाबा चौक येथे राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटील आणि भाजपाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. नवनिर्वाचित आमदार आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी यावेळी उपस्थित होते. कंपनीकडून रिजेक्टेड साडय़ा वाटल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ‘आम्हाला हवी विकासाची गाडी, नको आम्हाला चंपा साडी’, ‘भ्रष्टाचाराची साडी चंपा साडी’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

तुपे म्हणाले, चंद्रकांत पाटील आता एक लाख साडय़ा वाटत आहेत, याचा अर्थ त्यांनी निवडणुकीच्या काळात काय काय वाटले असेल याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. एका बाजूला पंतप्रधान भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे यांचे नेते राजरोसपणे भ्रष्टाचार करत आहेत. लोकांना प्रलोभने दाखवत आहेत. यांच्याकडून लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. पुण्यातील भूखंडाचा जो भ्रष्टाचार यांच्याकडून करण्यात आला त्यातून यांनी बक्कळ पैसा कमवला आहे. त्यामुळे लोकांना आता ते फुकट साडी वाटणार आणि पुढची पाच वर्षे राज्याला आणि पुण्याला लुटण्याचा यांचा अजेंडा आहे. एकप्रकारे ‘चंपा साडी सेंटर’ यांनी पुण्यात सुरु केले आहे. पाटील यांनी पुणेकरांची माफी मागायला हवी. त्यांची आमदार होण्याची सुद्धा पात्रता नाही. त्यांनी राजीनामा द्यावा. मतदारांना मतदानाच्या आधी आणि नंतर प्रलोभने दाखवणे कायद्याने गुन्हा आहे. याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहोत, असेही ते म्हणाले.