मुंबई, 11 : पुणे शहर, जिल्हाच नव्हे, तर राज्यात कर्क रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाला नियंत्रित करण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. कर्क रुग्णास कमी खर्चात उपचार मिळण्यासाठी शासनाच्यावतीने पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे शहरातील ससून रुग्णालय गोरगरिबांचे मोठे अशास्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी 5.50 लाख इतके रुग्ण बाह्य रुग्ण म्हणून येतात, तर आंतर रुग्ण 60 हजारपेक्षा जास्त दाखल होतात. या रुग्णालयात दाखल होणारी रुग्ण संख्या लक्षात घेता येथे रुग्ण नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्याचा शासनाचा विचार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.
ससून रुग्णालयाबाबत सदस्य सुनील कांबळे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, नाना पटोले यांनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, ससून रुग्णालयात औषधांची कमतरता नसून 12 कोटी 84 लाख रुपयांची औषधी खरेदी करण्यात आली आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीकडे अधिकची औषध खरेदीसाठी पैशांची मागणी करण्यात आली आहे. या रुग्णालयात उपकरणांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. रुग्णालयात 155 अति दक्षता विभागातील खाटा आहेत. बाल रुग्णांसाठी यामधील काही खाटा राखीव ठेवण्यात येत वेगळा कक्ष सुद्धा ससूनमध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे.
ससून रुग्णालयाच्या विविध प्रश्नांवर अधिवेशन संपल्यानंतर पुणे शहरातील लोकप्रतिनिधींच्या दौऱ्याचे आयोजन करून त्यांच्या समवेत बैठक घेण्यात येईल. ससून रुग्णालयातील वर्ग 4 ची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीकडे मागणी पत्र पाठवून पदभरती बाबत कार्यवाही करण्यात येत आहे. ससूनमध्ये व्हील चेअर उपलब्ध असून उपयोग करण्यासाठी मनुष्यबळची व्यवस्था करण्यात येत आहे. ससूनमध्ये स्वच्छतेची काम होत नसल्यास संबंधित कंत्राटदाराची चौकशी करण्यात येईल. रुग्णासोबत रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांची चांगली व्यवस्था करण्यात येईल. रुग्णालयाच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात येईल, असेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.