Thursday, December 12 2024 8:32 pm

पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे – मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील

मुंबई,27 : राज्यातील अवर्षणग्रस्त भागात अत्यल्प पाऊस झाला किंवा झालाच नाही त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी आल्यास टँकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असल्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य समाधान आवताडे यांनी मंगळवेढा, जि.सोलापूर येथील पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांना चाऱ्याविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, ज्या जिल्ह्यात जनावरांचा चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे किंवा होणार आहे, त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेऊन चारा छावणी आणि पाण्याचा टँकर सुरू करण्यात येणार आहे. अति पावसाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना आणि ज्या शेतात दुबार पेरणीची आवश्यकता आहे ,अशा ठिकाणी मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य बाळासाहेब थोरात, रोहित पवार, किशोर पाटील यांनी सहभाग घेतला.