ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी यंदा पावसाळयात कोणतेही साथीचे आजार होऊ नयेत यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
सात दिवसांपेक्षा जास्त दिवस साठविलेल्या किंवा साचलेल्या पाण्यात, धुणी-भांडी करण्यासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे उघडे ड्रम्स, घराच्या आसपास पडलेल्या नारळयाच्या करवंटया, वाहनांचे टायर्स, बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे हौद, हवाबंद झाकण नसलेले हौसिंग सोसायटयांचे ओव्हरहेड टँक्स आदींमध्ये पाणी साचून डासांची निर्मिती होऊन त्यापासून मलेरिया होण्याची शक्यता असते.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, पाणी शुध्द करण्यासाठी क्लोरिन वापरावे, इमारतीमधील व घरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात, शिळे, उघडयावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नयेत, साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे, सात दिवसांपर्यंत पाणी साठवून ठेऊ नये, साठविलेल्या पाण्याच्या ड्रम्सवर घट्ट झाकण बसवावे, सोसायटीच्या आवारात, मोकळ्या जागेत, टेरेसवर किंवा घराभोवती नारळाच्या करवंटया, वाहनांचे टायर्स, रिकामे डबे असल्यास त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी तसेच सेप्टीक टँक त्वरीत दुरुस्त करुन घेवून सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवावा.
दरम्यान पावसाळयाच्या दिवसात ताप किंवा इतर कोणत्याही आजाराची लागण झाल्यास लगेचच नजीकच्या महापालिकेच्या रुग्णालयात, आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी तसेच स्वतःच्या घरातील अगर आजुबाजूची व्यक्ती हिवताप, डेंग्यू फिव्हर, कावीळ, हगवण, विषमज्वर (टायफॉईड), लेप्टोस्पायरोसिस इ. साथीच्या रोगांनी आजरी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती त्वरीत नजिकच्या महापालिकेच्या दवाखान्यात, आरोग्य केंद्रे अथवा आरोग्य विभाग मुख्य कार्यालयात देऊन वेळीच उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
पावसाळ्यात नागरिकांनी घ्यावयाची काळजी
१.पाणी गाळून व १० मिनिटे उकळुन प्यावे.
२.पाणी शुध्द करण्यासाठी क्लोरिन ( गोळया / द्रावण ) वापरावे.
३.आपल्या इमारतीमधील गच्चीवरील व जमिनीवरील टाकी तसेच घरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ करून घ्याव्यात. तसेच त्या टाक्यांची झाकणे व Over Flow Pipe जाळीने अच्छादित करावेत.
४. हात स्वच्छ धुतल्याशिवाय काही खाऊ नये .
५. शिळे तसेच उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नयेत.
६. उघड्यावर शौचास बसु नये.
७. जुलाव झाल्यास ओ.आर.एस. पाकिटे आरोग्य केंद्रांतून मोफत घ्यावीत.
८. लेप्टोस्पायरोसीस आजार दुषित पाण्यामुळे होऊ नये याकरीता साचलेल्या पाण्यातुन चालणे टाळावे, पायाला जखम असल्यास साठलेल्या पाण्यातून चालत जाऊ नये, साचलेल्या पाण्यातून चालताना अनवाणी न चालता गमबुटाचा वापर करावा तसेच उंदरांमुळे लेप्टोपायरॉसिसचा अधिक प्रसार होतो याबाबत काळजी घ्यावी.
९. स्वतःचे घरातील अगर आजुबाजुच्या कोणीही व्यक्ती कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर ( टायफॉईड ) इ. साथीच्या रोगांनी आजारी असल्याचे समजल्यास त्यांची माहिती त्वरित नजीकच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात अथवा आरोग्य विभाग, मुख्य कार्यालयात देऊन वेळीच उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करावे.