Monday, April 6 2020 12:42 pm

पालिका वर्तुळातील वादंगाचे पडसाद-ठाणे पालिकेचा अर्थसंकल्प पडला लांबणीवर !

ठाणे : ठाणे पालिकेत तब्बल ५ वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ वाढीव मुदतीत  वावरणारे पहिले आयुक्त संजीव जयस्वाल ठरले. मागच्या पाच वर्षात वेळेत पालिकेचा अर्थसंकल्प मंजूर होत होता. आणि अंमलबजावणीची लगबग सुरु होत होती. ती लगबग यंदा दिसून येत नाही. तर लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाच्या वादात पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प लांबणीवर पडलेला आहे. पचवर्ष मुदतीत सादर होणार अर्थसंकल्प यंदा फेब्रुवारी महिना संपत आला तरीही अर्थसंकल्पाच्या हालचाली दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
      ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करून प्रथम तो स्थायी समितीला सादर करण्यात येतो. स्थायी समिती सदस्य अर्थसंकल्पावर चर्चा करून त्यात आवश्यक अनावश्यक यांचा विचार करून काही सूचनांचा अंतर्भाव करून अर्थसंकल्प महासभेत मंजुरीसाठी सादर करण्यात येतो. यासाठी किमान आठवड्याचा कालावधी लागतो. त्यानंतर महासभेत या सार्थसंकल्पावर तीन ते चार दिवस समग्र चर्चा करून महासभेच्या सूचना महापौर अर्थसंकल्पाला मंजुरी देत शिक्कामोर्तब करण्यात येतो. त्यानंतर प्रशासन लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या सूचनांचा समावेश करायचा कि नाही याचा निर्णय प्रशासन घेतात आणि अर्थसंकल्प जाहीर करतात. मात्र फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा उलटला तरीही पालिका प्रशासनाकडून यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत कुठलीच हालचाल दिसत नसल्याने ठाणे पालिकेचा अर्थसंकल्प २१ मार्चपूर्वी मंजुर होण्याची शक्यता धूसर झालेली आहे. अर्थसंकल्प लांबणीवर पडेल याचमुळे महापौर नरेश म्हस्के यांनी सूचनाही केल्याची माहिती आहे. अर्थसंकल्पाच्या कुठल्याच हालचाली दिसत नाहीत. तर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात खडाजंगी झाल्याने वातावरण गढूळ झाले आहे. त्याचे पडसाद ठाणे पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पावर पडत आहेत. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प लांबणीवर पडणार  दिसत आहे.